पवनचक्क्यांमुळे डोंगरकुशीतील गावे धोक्यात

By Admin | Updated: August 4, 2014 00:44 IST2014-08-03T23:42:31+5:302014-08-04T00:44:01+5:30

हेमंत आवारी, अकोले आढळा खोऱ्यातील विश्रामगड-बित्तमगड परिसराचा डोंगरमाथा पवन चक्क्यांच्या उभारणीमुळे पोखरला

Due to windmills threatens mountainous villages | पवनचक्क्यांमुळे डोंगरकुशीतील गावे धोक्यात

पवनचक्क्यांमुळे डोंगरकुशीतील गावे धोक्यात

हेमंत आवारी, अकोले
आढळा खोऱ्यातील विश्रामगड-बित्तमगड परिसराचा डोंगरमाथा पवन चक्क्यांच्या उभारणीमुळे पोखरला असल्याने या भागातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या टुमदार आदिवासी खेड्यांतील लोकांचा जीव मुठीत आला आहे. संभाव्य धोक्याचे तज्ज्ञांकडून व सरकारी यंत्रणेकडून सर्वेक्षण व्हावे,अशी मागणी पुढे येत आहे. तालुक्यात बित्तमगड व पट्टा किल्ला भागातील जायनावाडीचा महाकाय डोंगर, एकदरा, तिरडे, कोकणवाडी, वारंघुशी, शेणीत, मान्हेरे, खिरविरे, कोंभाळणे भागात जवळपास अडिचशे पवन चक्क्या उभारल्या गेल्या आहेत. प्रकल्प उभारणीसाठी डोंगर खडक फोडून रस्ते तयार करण्यात आले आहेत. वीज वाहून नेण्यासाठी खांब, टॉवरचे जाळे परिसरात झाले आहे. महाकाय दगड डोंगरापासून अलग होऊन घरंगळत शेत जमिनीत आले आहेत. पवनचक्कीचे पाते फिरताना मोठा आवाज सतत घोंगत असतो. या डोंगरमाथ्यावर पूर्वी पावसाचे पाणी ओघळून येत असे, परंतु आता पाणी माथ्यावरच जिरत असल्याने भूस्खलनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे डोंगराच्या पोटात वसलेल्या आदिवासी खेड्यांना धोका निर्माण झाला आहे.
भीमाशंकर ते त्र्यंंबकेश्वर या पट्ट्यातील ही गावे असून पावसाळ्यात येथील डोंगर चिंब होतात. भविष्यात ‘माळीण’ गावासारखी दुर्घटना होऊ नये यासाठी संभाव्य धोकादायक खेड्यांचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. पर्वतराईचा खडक पक्का असला तरी काही ठिकाणी पवनऊर्जा प्रकल्पामुळे तो ठिसूळ झाला आहे म्हणून संभाव्य धोका वाढला आहे. बितका एकदरे परिसरातील डोंगराची माती खचल्याने पाण्याचा चर गाडला गेला.
इतिहासाची आठवण
जून २००५ मध्ये घाटघर गावाजवळ डोंगराचे भूस्खलन होऊन शाहीनाला आडला गेला होता. घाटघर जलविद्युत प्रकल्पातील ‘लोअर डॅम’चे पाणी वीज निर्मिती बोगद्यात घुसले, त्यात मोठी वित्त व जिवीतहानी झाली. या दुर्घटनेमुळे घाटघर येथील ‘रोप वे’ ची उभारणी सरकारला बंद करावी लागली. गत वर्षी दुर्गम फोफसंडी येथे भूस्खलन झाले. काही वर्षांपूर्वी शिरपुंजे गावाजवळील बहिरोबाच्या डोंगराचा कडा कोसळून खाली आदिवासींच्या घरावर आल्याने नुकसान झाले होते. आजही डोंगरावरुन घरंगळत आलेले ‘ते’ महाकाय दगड भूस्खलनाची आठवण करुन देतात.
एकदरा, गावठा, कोकणेवाडी, जायनावाडी, बाभूळवंडी, पिंपळगाव नाकविंदा, गुहीरे, सरोवरवाडी तेरुंगण, पाचनई, पेठेवाडी, रतनवाडी, कोल्हाटवाडी, जहागीरदारवाडी, बारी अशी गावे डोंगर पोटाला वसली आहेत.
विकासकामे करताना पर्यावरण तज्ज्ञांकडून तपासणी करुन सल्ला घेण्यात यावा. पर्यावरणपूरक कामे व्हावेत. निसर्गदत्त ठेव्याला धोका पोहचता कामा नये. नाहीतर निसर्ग माफ करणार नाही.
- शांताराम गजे,
पर्यावरणवादी लेखक

Web Title: Due to windmills threatens mountainous villages