अहमदनगर : शहरातील प्रत्येक बालकाचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात राष्ट्रीय जंतनाशक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
महापालिकेने हाती घेतलेल्या राष्ट्रीय जंतनाशक सप्ताहानिमित्त महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते तोफखाना आरोग्य केंद्रात बालकांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच नागापूर येथील आरोग्य केंद्रात नगरसेवक तथा आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांच्या हस्ते गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या, राष्ट्रीय जंतनाशक सप्ताहानिमित्त नगर शहरातील बालकांना घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका जंतनाशक गोळ्यांचे वाटप करणार आहेत. महापालिकेच्या वतीने अनेक आरोग्य सुविधा हाती घेण्यात आल्या असून, शहरातील नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी पुढे यावे. जेणेकरून संपूर्ण शहर कोरोनामुक्त होण्यास मदत होईल, असे आवाहन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर, डॉ. दिलीप बागल, डॉ. गणेश मोहळकर, डॉ. सुज्योत सैदाणे, डॉ. ऋषिकेश उदमले, प्रतिभा राऊत, मंगल माटे आदींसह नागरिक उपस्थित होते. नागापूर येथील आरोग्य केंद्रात बालकांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी बारस्कर म्हणाले, की महापालिकेची आरोग्य समिती नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध असून, बालकांना घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
...
सूचना फोटो २३ महापालिका व सागर बोरुडे नावाने आहे.