भरतीसाठी जाणाऱ्या तरुणांची आरोग्य केंद्रांवर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:25 IST2021-08-19T04:25:22+5:302021-08-19T04:25:22+5:30
तिसगाव : भारतीय सैन्यदलात सात ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी जाण्यापूर्वी लस घेण्यासाठी शनिवारी तिसगाव (ता.पाथर्डी) प्राथमिक आरोग्य केंद्रावर ...

भरतीसाठी जाणाऱ्या तरुणांची आरोग्य केंद्रांवर गर्दी
तिसगाव : भारतीय सैन्यदलात सात ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी जाण्यापूर्वी लस घेण्यासाठी शनिवारी तिसगाव (ता.पाथर्डी) प्राथमिक आरोग्य केंद्रावर तरुणाईची तोबा गर्दी झाली. उपलब्ध डोस व जमलेले युवक यात मोठी तफावत असल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे लसीकरण प्रक्रिया अनेकदा बंद पडली.
जिल्हा परिषद सदस्या संध्या आठरे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी यांनी भरती प्रक्रियेसाठी जाणाऱ्या मुलांची अडचण होऊ नये, यासाठी लसीकरण आयोजित केले होते. त्यानुसार, शनिवारी ४४० लसीचे डोस उपलब्ध केले होते, परंतु सातशे तरुणांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. सुरुवातीच्या रांगेतील निम्म्या जणांनाच टोकन वितरण होऊन लस देण्यात आली. त्यामुळे वंचित तरुणांनी तेथे गोंधळ घातला. पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी यांनी आरोग्याधिकारी व लसीकरण वंचित तरुणांचा संवाद घडवून आणला.
पुन्हा डोस उपलब्ध करण्यात येतील. त्यावेळी वंचित राहिलेल्या तरुणांचे लसीकरण केले जाईल, असे आश्वासन परदेशी यांनी दिले.