कोरोनाचा कोप, अत्यंसंस्कारावरच पालिकेचे २५ लाख खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:50+5:302021-06-10T04:15:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनाच्या संकट काळात सामाजिक बांधिलकी जपत मृत रुग्णांवर महापालिकेने अंत्यसंस्कार केले. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना ...

Corona's wrath, 25 lakh spent by the municipality on hygiene alone | कोरोनाचा कोप, अत्यंसंस्कारावरच पालिकेचे २५ लाख खर्च

कोरोनाचा कोप, अत्यंसंस्कारावरच पालिकेचे २५ लाख खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कोरोनाच्या संकट काळात सामाजिक बांधिलकी जपत मृत रुग्णांवर महापालिकेने अंत्यसंस्कार केले. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना ऐनवेळी धावपळ करावी लागली नाही. शहर व ग्रामीण भागातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मनपाचे आतापर्यंत सुमारे २५ लाख रुपये खर्च झाले आहेत.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात न देता प्रशासनाकडून अंत्यविधी केला जात आहे. ही जबाबदारी अहमदनगर महापालिकेने स्वीकारली आहे. महापालिकेवर वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच टीका होत असते. परंतु, कोरोनाच्या संकट काळात महापालिकेने केलेले हे काम शहरासह जिल्ह्यातील नागरिकांच्या कायमच स्मरणात राहील, असेच आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मृत्यूचा आकडा ६० वर पोहोचला होता. मनपाच्या नालेगाव येथील अमरधाम येथे एकच विद्युत दाहिनी होती. विद्युत दाहिनीत अंत्यविधी करण्यासाठी दीड तास लागतो. त्यामुळे अंत्यविधीसाठी वेटिंग होती. ही गरज लक्षात घेऊन मनपाने नालेगाव अमरधाम येथे आणखी एक विद्युत दाहिनी बसविली. परंतु, मृत्यूची संख्या वाढल्याने मनपाने लाकूड व गोवऱ्यांवर अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. पण, यामुळे सर्वत्र धुराचे लोळ पसरत होते. त्यामुळे महापालिकेने सावेडी कचरा डेपोत पत्र्याचे शेड उभारून तिथे अंत्यविधी करण्यास सुरुवात केली. महापालिकेने अंत्यविधी करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक केली. त्यांना प्रति दिवस ७०० रुपये रोजंदारी देण्यात आली. तसेच विद्युत दाहिनीची देखभाल दुरुस्ती, लाकूड व गोवऱ्यांसाठीही मनपाला पैसे मोजावे लागले. महापालिकेने नातेवाइकांकडून एक रुपयाही न घेता अंत्यविधीचा खर्च केला.

...

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित - २ लाख ६९ हजार ५६२

बरे झालेले - २ लाख ६० हजार ९१०

सध्या उपचार घेत असलेले - ५ हजार ८१

एकूण मृत्यू - ३ हजार ५७१

.....

एका अंत्यविधीसाठी ३ हजार ८०० रुपये

महापालिकेने अंत्यविधीसाठी चार स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे. त्यासाठी त्यांना प्रत्येकी ७०० रुपये रोज देण्यात येतो. चार स्वयंसेवकांचे २ हजार ८०० रुपये संबंधित संस्थेला दिले जात असून, विद्युत दाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रत्येकी १ हजार रुपये खर्च येतो. असे म्हणून एका अंत्यविधीसाठी ३ हजार ८०० रुपये खर्च येतो. याशिवाय लाकडावर अंत्यविधी केल्यास लाकूड, गोवऱ्या आदी साहित्यासाठी १ हजार ६०० रुपये लागतात. त्यामुळे अंत्यविधीचा ४ हजार ४०० रुपये खर्च येतो.

.....

अंत्यसंस्काराची जबाबदारी चार स्वयंसेवकांवर

महापालिकेने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक केली असून, अंत्यविधी करण्याची जबाबदारी स्वयंसेवकांवर आहे.

.....

- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. जिल्हा रुग्णालयातून मृतदेह नालेगाव किंवा सावेडी अमरधाम येेथे आणून अंत्यविधी करण्यात येत आहेत. हा सर्व खर्च महापालिका करत आहेत.

- सादिक पठाण, पर्यवेक्षक मनपा

--

Web Title: Corona's wrath, 25 lakh spent by the municipality on hygiene alone