शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना अद्याप गेला नाही, या चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST

अहमदनगर : कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर नियमांचे पालन न करता नागरिक घराबाहेर पडले. पूर्वीप्रमाणे लग्नसमारंभ, पर्यटन, ग्रामपंचायतींच्या निवडणुका ...

अहमदनगर : कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर नियमांचे पालन न करता नागरिक घराबाहेर पडले. पूर्वीप्रमाणे लग्नसमारंभ, पर्यटन, ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि नियमांचे उल्लंघन करीत केलेल्या प्रवासामुळे दुसरी लाट आली. दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली. दुसऱ्या लाटेनंतर नियम शिथिल करताच पुन्हा गर्दी करू होऊ लागली असून, त्यावर नियंत्रण न ठेवल्यास तिसरी लाट येऊ शकते.

नगर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १२ मार्च २०२० रोजी आढळून आला होता. पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर तातडीने लॉकडाऊन केला गेला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जमावबंदी आदेश लागू केला गेला. जिल्ह्याच्या सीमेवर पथके तैनात करण्यात आली. चाचण्या वाढविल्या गेल्या. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. रुग्ण आढळून आलेला भाग कंटेन्मेंट करून प्रशासनामार्फत अत्यावश्यक सेवा पुरविल्या गेल्या. नगर शहरात पहिला कंटेन्मेंट झोन मुकुंदनगर भागात करण्यात आला. त्यानंतर ही संख्या वाढून १७ वर पोहोचली होती. सुरुवातीला सर्वाधिक रुग्ण शहरी भागात आढळून येत होते. त्यानंतर ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. परिस्थिती आटाेक्यात आल्यानंतर नियम शिथिल करण्यात आले. पहिला अनलॉक ४ ऑगस्ट २०२० रोजी जाहीर झाला. नियम शिथिल केल्यानंतर राज्य सरकारने नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या; परंतु नियमांचे पालन न करता शहरासह जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच हजारोंच्या उपस्थित लग्नसमारंभ आयोजित केले गेले. दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. जिल्हाभर सामूहिक प्रचाराचा धुराळा उडाला. सहकारी संस्थांच्याही निवडणुका घेतल्या गेल्या. लॉकडाऊनमुळे घरात बसून असलेले नागरिक पर्यटनासाठी इतर जिल्ह्यात गेले. शहरातील नागरिक गावाकडे गेले. गाव खेड्यातून कामगार पुन्हा शहरात दाखल झाले. सर्वकाही सुरू झाल्यामुळे नागरिकही बिनधास्त झाले. प्रशासनाने ढील दिली. वाहनांची तपासणी होत नसल्याने विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढली. जनजीवन पूर्ववत होत असतानाच दुसरी लाट येऊन धडकली. दुसऱ्या लाटेत सुरुवातीला रुग्णसंख्या कमी होती. मात्र, काही दिवसांतच ती झपाट्याने वाढून एप्रिलमध्ये कोरोनाने कहर माजविला. जिल्ह्यातील रुग्णसंख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडला होता. दुसऱ्या लाटेची प्रशासकीय पातळीवरही कोणतीही तयारी केली गेली नाही. वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ झाली नाही. त्यामुळे बेड कमी पडू लागले. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. रेमडेसिविर उपलब्ध होत नव्हते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात भयावह स्थिती निर्माण झाली. रुग्णांची संख्या वाढून दुप्पट झाली. मागील मे महिन्याच्या शेवटी रुग्णसंख्या घसरली. त्यामुळे राज्य सरकारने १ जूनपासून नियम शिथिल करीत वेळेचे बंधन घातले खरे; परंतु पुन्हा गर्दी वाढू लागली आहे. पहिल्या लाटेनंतर ज्या चुका झाल्या, त्याच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ आहे.

.....

हजारोंच्या उपस्थितीत लग्न समारंभ

पहिल्या लाटेनंतर सरकारने लग्न समारंभासाठी गर्दी न करण्याचे आदेश दिले होते. शहरी भागात कारवाया झाल्याने मंगल कार्यालय चालकांनी काही प्रमाणात नियमांचे पालन केले; परंतु ग्रामीण भागात मात्र हजारोंच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पडले. लग्न समारंभात मास्क न वापरता नागरिक सहभागी झाले. त्यामुळे संसर्ग वाढवून एकदम उद्रेक झाला. लग्न समारंभामुळे संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

....

गावांमध्ये ग्रामपंचायतींचा सामूहिक प्रचार

पहिल्या लाटेत ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी होती. त्यामुळे कोरोनाबाबत ग्रामस्थ आधीच बेफिकीर होते. त्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला. उमेदवार व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. सामूहिक प्रचारातून कोरोनाचा संसर्ग झाला. गावोगावी रुग्णसंख्या वाढली. त्यात गावाकडील रुग्णांनी अंगावर काढत घरगुती उपचार केले. काहींनी आजार लपविला. त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्या अचानक वाढली. परिणामी बेड कमी पडले. आरोग्य यंत्रणेवर ताण आला.

.......

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रास उल्लंघन

कोरोनाची पहिली लाट ओसरली. सहा महिन्यांपासून घरात बसून असलेले नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. कोरोना गेला, असे समजून नियमांकडे दुर्लक्ष केले गेले. अनेक जण तर मास्कही लावत नव्हते. हॉटेल, चहाच्या टपऱ्या, खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरील गर्दी वाढली. गावच्या पारावर लोकं पूर्वीप्रमाणे एकत्र येत असल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळाले. एकमेकांचा संपर्क वाढला. कार्यालये सुरू असल्याने अभ्यंगतांची ये-जा सुरू झाली. सरकारी कार्यालयांतील बैठका पूर्वीप्रमाणेच होऊ लागल्या. त्यामुळे कार्यालयांतील अनेक अधिकारी-कर्मचारी पॉझिटिव्ह आले.

.......

पर्यटनस्थळी गर्दी

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने सर्वच जण घरात बसून होते. कोरोनाचा आकडा ओसरल्याने नागरिकांमधील भीती कमी होत गेली. शासनाने पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे पर्यटन व धार्मिक स्थळांवर गर्दी झाली. मास्क न वापरता नागरिक पर्यटन स्थळी वावरू लागल्याने संसर्ग वाढला.

........

प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली

पहिली लाट ओसरल्यानंतर रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले. लॉकडाऊनच्या काळात वाहनांची तपासणी केली जात होती. नियम शिथिल झाल्यानंतर प्रवासाला मुभा मिळाली. नियमांचे पालन न करता नागरिक प्रवासासाठी बाहेर पडले. रस्त्यावरही गर्दी वाढली. त्यामुळे कोरोना संसर्ग होऊन दुसऱ्या लाटेत अचानक रुग्णसंख्या वाढली.

.....

पहिला अनलॉक

४ ऑगस्ट २०२०

एकूण रुग्णसंख्या

७५ हजार

मृत्यू

१ हजार १४३

....

दुसरा अनलॉक

१ जून २०२१

एकूण रुग्णसंख्या

१ लाख ५० हजार

मृत्यू

१ हजार ४२०

....

मनपाच्या ४ दक्षता पथकांची नजर

महापालिकेने शहरातील गर्दीवर नजर ठेवण्यासाठी चार दक्षता पथकांची नियुक्ती केली, तसेच पोलिसांकडून प्रमुख चौकांत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेत विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच कोविड चाचणी करण्याची मोहीम प्रशासनाने राबविली. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास काही अंशी मदत झाली. चाचणीच्या भीतीने विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली.