खड्डे केले ठेकेदाराने भुर्दंड पालिकेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:21 IST2021-07-26T04:21:27+5:302021-07-26T04:21:27+5:30

अहमदनगर : फेज-२ पाणी योजनेचे पाईप टाकण्यासाठी केलेल्या खोदाईमुळे रस्त्यांत मोठे खड्डे पडलेले आहेत. ठेकेेदाराने केलेले खड्डे पालिकेकडून बुजविण्यात ...

The contractor made the pits to Bhurdand Municipality | खड्डे केले ठेकेदाराने भुर्दंड पालिकेला

खड्डे केले ठेकेदाराने भुर्दंड पालिकेला

अहमदनगर : फेज-२ पाणी योजनेचे पाईप टाकण्यासाठी केलेल्या खोदाईमुळे रस्त्यांत मोठे खड्डे पडलेले आहेत. ठेकेेदाराने केलेले खड्डे पालिकेकडून बुजविण्यात येणार असून, तसा प्रस्ताव स्थायी समितीला सादर करण्यात आला आहे. स्थायी समिती हा प्रस्ताव फेटाळणार की खड्ड्यांवर तिजोरी रिकामी करणार, ते पहावे लागेल.

शहरात फेज-२ पाणी योजनेचे काम सुरू आहे. रस्ते खोदून त्यात पाणी योजनेचे पाईप टाकण्यात येत आहेत. ही योजना गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. पाणी योजनेचे पाईप टाकण्यासाठी ठेकेदाराने अक्षरश: रस्त्याची चाळण केली आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून चिखल झाला आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला. प्रभाग क्रमांक १ ते ८ मधील खड्डे बुजविण्यासाठी ४९ लाख ८० हजार रुपये, तर प्रभाग क्रमांक ९ ते १७ साठी ४९ लाख ८९ हजार इतका खर्च अपेक्षित आहे. पाणी योजनेचे काम पाणीपुरवठा विभागामार्फत सुरू आहे. फेज-२ च्या निविदेत पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते ठेकेदाराने बुजवावेत, अशी अटच नव्हती, असे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. त्यावर बांधकाम विभागाने आक्षेप घेतला असून, पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते बुजविण्याची जबाबदारी ठेकेदाराचीच आहे. तशी अट फेज-२ पाणी योजनेच्या निविदेत आहे, असे बांधकाम विभागाने प्रस्तावात नमूद केले आहे. रस्त्यातील खड्डे बुजविण्याबाबत बांधकाम व पाणीपुरवठा विभागात मतभेद आहेत. पाणीपुरवठा विभागाने तशी अट नसल्याचे नमूद केले असून, खड्डे बुजविण्याचा खर्च महापालिकेने करावा कसा असाही प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराने पैसे घेतले. त्यासाठी ठेकेदाराने शहरातील रस्ते खोदले. रस्ते खोदाईमुळे पडलेले खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीतून पैसा खर्च केला जात असून, ही एकप्रकारे सर्वसामान्य नागरिकांनी कर रुपाने भरलेल्या पैशाची उधळपट्टीच ना , असा प्रश्न जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे.

.....

४० लाखांचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. महापालिकेकडे ऑक्सिजन पुरविण्याची कुठलीही सुविधा नव्हती. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने आरोग्य विभागाने १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर केला आहे. ही खरेदी शासनाच्या ईमार्केटप्लस पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. सर्वात कमी दराची निविदा मध्यप्रदेशमधील साक्षी ॲण्ड सेल्स सोलुशन्स कंपनीची आहे. या कंपनीकडून ७ लीटर क्षमतेचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्यात येणार आहेत.

Web Title: The contractor made the pits to Bhurdand Municipality