अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST2021-09-07T04:27:15+5:302021-09-07T04:27:15+5:30
अहमदनगर : पाथर्डी, शेवगाव, नगर तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या आजी-माजी ...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी
अहमदनगर : पाथर्डी, शेवगाव, नगर तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या आजी-माजी आमदारांनी जिल्हा प्रशासनाकडे सोमवारी केली. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना दिले.
या वेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, वसंत चेडे, अशोक खेडकर, दिलीप भालसिंग, माणिक खेडकर, अंबादास पिसाळ, अनिल लांडगे, वसंत सोनवणे, जिजाऊ लोंढे, बाळासाहेब अकोलकर, मनोज कोकाटे उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पाथर्डी, शेवगाव, नगर तालुक्यासह इतर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकरी, व्यावसायिक, पशुपालक यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकरी व छोटे उद्योग-धंदे करणारे अनेक व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
पुराचे पाणी तसेच बंधाारे फुटल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना सरसकट ६० हजार एकरी मदत मिळावी. आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग व्हावी. छोटे व्यावसायिक, उद्योग-धंदे करणारे यांच्या दुकानात पाणी शिरल्यामुळे त्यांचा कच्चा माल तसेच किराणा माल निकामी झालेला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी. गायी, म्हशी, शेळ्या, कोंबड्या पाळणारे पशुपालक यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना गायी-म्हशीसाठी प्रत्येकी एक लाख रुपये व शेळ्या, कोंबड्यांसाठी दहा हजार रुपये आर्थिक मदत मिळावी.
ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे किंवा पडझड झालेली आहे, घरातील भांडीकुंडी वाहून गेलेली आहेत, अशा नुकसानग्रस्तांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत मिळावी. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी बुजल्या व शेततळे फुटले, वाहून गेले अशा शेतकऱ्यांना एक लाखाची भरपाई मिळावी. याशिवाय रस्ते दुरुस्ती, वीजपुरवठा, रोहित्रांची दुरुस्ती करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
---------
फोटो- ०६बीजेपी
अतिवृष्टीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी भाजपच्या आजी-माजी आमदारांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. जिल्हाधिकारी कार्यालयात या वेळी आमदार बबनराव पाचपुते, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले आदी.