बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:41 IST2026-01-02T11:38:04+5:302026-01-02T11:41:00+5:30
Bunty Jahagirdar shrirampur: श्रीरामपूरमधील बंटी जहागीरदार हत्या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी पळून जाण्यासाठी कारचा वापर केला होता.

बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी बंटी जहागीरदार याच्या हत्या प्रकरणाने श्रीरामपूरमध्ये खळबळ माजली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बंटी जहागीरदारची गोळ्या घालून हत्या केली होती. फरार असलेल्या आरोपींना पकडण्यात अहिल्यानगरपोलिसांना अखेर यश मिळाले. फरार असलेल्या दोघांना पोलिसांनी समृद्धी महामार्गावरून अटक केली.
बंटी जहागीरदारवर बुधवारी (३१ डिसेंबर) दुपारी दोघांनी गोळ्या झाडल्या होत्या. तीन गोळ्या लागल्याने बंजी हाजी जहागीरदार हा गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. श्रीरामपूरवरून त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
श्रीरामपूरमधील गरीब नवाज कब्रस्तानासमोर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात दोन हल्लेखोर दुचाकीवरून येताना आणि गोळीबार करताना दिसले.
Bunty Jahagirdar Firing CCTV : पुण्यात 10 वर्षांपूर्वी साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी बंटी जहागीरदारला दिवसाढवळ्या संपवलं; CCTV समोर pic.twitter.com/ZSIjkOmYAQ
— Prashant Patil (@Prashant_P95) January 1, 2026
पोलिसांनी आरोपींना कसे पकडले?
गोळ्या झाडल्यानंतर आरोपी फरार झाले होते. गुरुवारी दुचाकी सोडून कारमधून बळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी दोघांना पकडले. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरात पहाटे समृद्धी महामार्गावर पोलिसांनी त्यांना अटक केली.
अरुण शिनगारे (वय २३) आणि रवींद्र गौतम निकाळजे (वय २३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली होती.
कशी केली हत्या?
या प्रकरणात पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, अमीन गुलाब शेख आणि बंटी जहागीरदार एका अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधी आटोपून दोघे दुचाकीवरून परत येत होते, त्याचवेळी संत लूक हॉस्पिटलसमोर दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी गोळ्या झाडल्या आणि घोषणा दिल्या.
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, "आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांना शस्त्र कोणी पुरवली आणि या हत्येचा कटामध्ये आणखी कोण सहभागी आहेत, याचा तपास केला जात आहे. सध्या शहरातील स्थिती नियंत्रणात आहे. पोलीस दलासह राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत.