बोरगे सक्तीच्या रजेवर, आरोग्य अधिकारीपदी राजूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:49+5:302021-06-10T04:15:49+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा पदभार प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीष राजूरकर यांनी बुधवारी स्वीकारला. डॉ. अनिल ...

बोरगे सक्तीच्या रजेवर, आरोग्य अधिकारीपदी राजूरकर
अहमदनगर : महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा पदभार प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीष राजूरकर यांनी बुधवारी स्वीकारला. डॉ. अनिल बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. रजेवर पाठवू नये असे पत्र बोरगे यांनी आयुक्तांना दिले. मात्र, प्रशासनाने त्यांचे म्हणणे फेटाळले.
कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी असताना डॉ. बोरगे हे अनेक बाबतीत अपयशी ठरले, असे कारण देत बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश आयुक्त शंकर गोरे यांनी काढला. त्यानुसार राजूरकर यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांनी आरोग्य केंद्रांना भेटी देऊन लसीकरणाची माहिती घेतली. दरम्यान डॉ. बोरगे यांनी दुपारी महापालिका आयुक्त गोरे यांची भेट घेऊन सविस्तर लेखी खुलासा सादर केला. आपण कामात कोठेही कमी पडलो नाही, असा दावा त्यांनी केला. परंतु, आयुक्त गोरे यांनी त्यांचे म्हणणे फेटाळले. त्यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी उपायुक्त यशवंत डांगे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसा स्वतंत्र आदेश गोरे यांनी काढला. कोविड रुग्णालयांना परवानगी देताना नियमांचे पालन केले नाही, यासह १७ प्रकाराचे गंभीर ठपके बोरगे यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. या सर्व मुद्यांची चौकशी करून आयुक्तांना अहवाल सादर केला जाणार आहे.
.....
माझ्या एकट्यावरच कारवाई का ?
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, सहाय्यक आयुक्त संतोष लांडगे, सचिन राऊत यांना स्वतंत्र अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची आहे. त्यांच्या कर्तव्याबाबत मला कुठलेही अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी न केलेल्या कामांबाबत मला जबाबदार धरणे संयुक्तिक ठरणार नाही. मला सक्तीच्या रजेवर पाठवू नये, असे बोरगे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
....
- प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा पदभार डॉ. सतीष राजूरकर यांनी स्वीकारला असून, तसा अहवाल त्यांनी कार्यालयास सादर केला आहे. तसेच बोरगे यांच्याबाबत जे १७ मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत त्याची चौकशी करून अहवाल आयुक्तांना सादर केला जाईल.
- यशवंत डांगे, उपायुक्त, महापालिका