अहमदनगर : भिंगार कॅम्प ठाण्याचे पोलीस फरार आरोपीला ताब्यात घेऊन जात असताना रस्त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पाच जणांनी पोलिसांचे वाहन अडवून लोखंडी रॉडने मारहाण केल्यानेच माझा पती जखमी झाल्याची फिर्याद आरोपीच्या पत्नीने दिली आहे. तर आरोपीने पोलीस वाहनातून उडी मारल्याने तो जखमी झाला आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आता या प्रकरणातील सत्य काय आहे, हे चौकशीअंतीच समोर येणार आहे.
सदीक लाडलेसाहब बिराजदार (वय ३२, रा. मुकुंदनगर) असे जखमी आरोपीचे नाव आहे. नगर शहरातील भिंगार नाल्याजवळ रविवारी रात्री ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सादिक बिराजदार याच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात ४९८, ३७६, बालविवाह प्रतिबंधक कायदा व पोक्सो अंतर्गत २८ जून २०२१ रोजी गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. आरोपी त्याच्या घरी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. भिंगार ठाण्यातील दोन पोलिसांनी रविवारी सायंकाळी साडेसात वाजता सादिक याला त्याच्या मुकुंदनगर येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. पोलीस सादिक याला शासकीय वाहनातून पोलीस स्टेशनला घेऊन जात होते. पोलिसांचे वाहन भिंगार नाल्याजवळ जाताच आरोपी गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला प्रथम जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे त्याला दाखल करून घेण्यात आले नाही. त्यानंतर पोलिसांनी सादिक याला शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सादिक हा व्हेंटिलेटरवर असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
....................
लोखंडी रॉडने पतीला मारहाण-आरोपीची पत्नीची तक्रार
सादिक बिराजदार जखमी झाल्यानंतर त्याची पत्नी रुक्सार बिराजदार (२२) हिने रविवारी रात्री कॅम्प ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुनीया ऊर्फ अजीम रसुल सय्यद, रशीद रसुल सय्यद, कुददुस रशीद सय्यद, मोईन मुनीया ऊर्फ अजीम सय्यद, अर्शद मुनीया ऊर्फ अजीम सय्यद (सर्व रा. दर्गादायरा, मुकुंदनगर) यांच्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट रोजी रोजी रात्री साडेसातच्या दरम्यान भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांनी माझा पती सादिक बिराजदार याला ताब्यात घेऊन त्यांच्या वाहनातून घेऊन गेले. आरोपीच्या जामिनासाठी तुम्ही पोलीस स्टेशनला या, असे पोलिसांनी मला सांगितले. तेव्हा मी माझ्या कुटुंबीयासह रिक्षातून पोलिसांच्या मागे गेले होते. भिंगार नाल्याजवळ मला पोलिसांची गाडी थांबलेली दिसली. यावेळी सादिकला पाच जण लोखंडी रॉडने मारहाण करत होते. रस्त्यावर असलेल्या लाईटच्या उजेडात मला आरोपी दिसले, असे या फिर्यादीत म्हटले आहे.
...................
याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून नगर शहराचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी देण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर या प्रकरणात योग्य ती कार्यवाही केली जाईल.
-मनोज पाटील, पोलीस अधीक्षक अहमदनगर