स्मार्ट एलईडी प्रकल्पावर सेनेचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:08+5:302021-07-24T04:14:08+5:30

अहमदनगर : महापालिकेतील भाजपच्या कार्यकाळात सुरू झालेला स्मार्ट एलईडी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता शिवसेनेने कंबर कसली आहे. ...

Army flag on smart LED project | स्मार्ट एलईडी प्रकल्पावर सेनेचा झेंडा

स्मार्ट एलईडी प्रकल्पावर सेनेचा झेंडा

अहमदनगर : महापालिकेतील भाजपच्या कार्यकाळात सुरू झालेला स्मार्ट एलईडी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता शिवसेनेने कंबर कसली आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळातील पूर्ण होणारा हा पहिलाच प्रकल्प ठरणार असून, या प्रकल्पाचे श्रेय कोणी घ्यायचे असा प्रश्न आता राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.

शहर परिसरातील पथदिव्यांबाबत नगरसेवकांच्या अनेक तक्रारी होत्या. महापालिकेलाही वीज बिलासह पथदिव्यांची देखभाल करणे अशक्य झाले होते. त्यामुळे महापालिकेने शहरातील पथदिव्यांचा प्रकल्प बीओटीवर देण्याचा निर्णय घेतला. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी स्मार्ट एलईडी प्रकल्प हा आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे सांगून तो पूर्ण करण्याची घोषणा केली होती. परंतु ठेकेदारांच्या स्पर्धेतून झालेला वाद थेट न्यायालयात पोहोचला. त्यामुळे हा प्रकल्प मध्यंतरी थांबला होता. परंतु, राष्ट्रवादीने मध्यस्थी करत न्यायालयीन वाद संपविला. दरम्यान महापालिकेत सत्तांतर झाले. भाजपची सत्ता गेली. आणि महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. महापौरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिवसेनेने हा अर्धवट प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रकल्पाचा आढावा घेऊन सोपस्कार पूर्ण करण्याच्या प्रशासनाला सूचना केल्या. शहरातील पथदिव्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. शहरात २४ हजार १८३ पथदिवे आहेत, असा अहवाल संबंधित संस्थेने दिला.

या दिव्यांसाठी किती वीज लागते, याची त्रयस्थ संस्था म्हणून औरंगाबाद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी करण्याचे काम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून सुरू असून, हे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला जाणार आहे. १ ऑगस्टपासून स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याचे काम सुरू होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापौर-उपमहापौर यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनीही या प्रकल्पाची माहिती घेऊन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हातभार लावला आहे.

.....

विद्युत साहित्य खरेदीसाठीचाही प्रस्ताव सादर

महापालिकेने हाती घेतलेल्या स्मार्ट एलईडी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील महिन्यात संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला जाणार आहे, परंतु, नवीन पथदिवे बसविण्यासाठी साधारणतः तीन ते चार महिने लागू शकतात. त्यामुळे विद्युत विभागाने विद्युत साहित्य खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर केला आहे. समितीच्या आदेशाने दर पथक निश्चित करून आवश्‍यकतेनुसार साहित्य खरेदी केले जाणार आहे.

Web Title: Army flag on smart LED project