पुणे-नाशिक रेल्वेमार्गातून अकोले वगळू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST2021-06-22T04:15:38+5:302021-06-22T04:15:38+5:30

अकोले : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी मुंबईत भेट घेऊन नियोजित पुणे-नाशिक हायस्पिड रेल्वेमार्ग पूर्वीच्या सर्वेक्षणानुसार बोटा- घारगाव-देवठाण- सिन्नर ...

Akole should not be left out of Pune-Nashik railway line | पुणे-नाशिक रेल्वेमार्गातून अकोले वगळू नये

पुणे-नाशिक रेल्वेमार्गातून अकोले वगळू नये

अकोले : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी मुंबईत भेट घेऊन नियोजित पुणे-नाशिक हायस्पिड रेल्वेमार्ग पूर्वीच्या सर्वेक्षणानुसार बोटा- घारगाव-देवठाण- सिन्नर असाच व्हावा याबाबत आग्रह धरणार आहे. वेळ पडल्यास कृती समितीच्या बरोबरीने आंदोलनात सहभागी होऊ. तसेच शिर्डी-शहापूर रेल्वेमार्ग व्हावा, ही तालुक्याची जुनीच मागणी पुन्हा सरकार दरबारी मांडणार असल्याचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी सांगितले.

पुणे-नाशिक हायस्पिड रेल्वेमार्गातून अकोले तालुका वगळू नये, या मागणीसाठी अकोले तालुका रेल्वेमार्ग संघर्ष कृती समितीच्या वतीने सोमवारी धरणे आंदोलन छेडण्यात आले. सायंकाळी आमदार डाॅ. लहामटे यांच्या उपस्थितीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. रेल्वेमार्ग संघर्ष कृती समितीच्या मागणीला डॉ. लहामटे यांनी पाठिंबा दिला.

नाशिक-पुणे हायस्पिड रेल्वेमार्गाचा पूर्वी जो सर्व्हे झाला, त्यात तालुक्यातील देवठाण येथे उपरेल्वे स्टेशन प्रस्तावित होते. नव्या सर्व्हेत संगमनेर शहराच्या पूर्वेकडून रेल्वेमार्ग दाखवला आहे. भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे.

नवा रेल्वेमार्ग ४० किलोमीटरने वाढल्याने तीन हजार कोटी आर्थिक भार सरकारवर पडणार आहे. तसेच पुणे-नाशिक प्रवासाचा वेळ दीड तासांनी वाढणार आहे. तालुक्यातील पर्यटन विकास व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी व शेतीपूरक व्यवसायास चालना मिळेल, यासाठी अकोले तालुक्यास रेल्वेमार्गातून वगळू नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा रेल्वेमार्ग संघर्ष कृती समितीने दिला.

तहसीलदार मुकेश कांबळे व सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी निवेदन स्वीकारले. रेल्वेमार्ग संघर्ष कृती समितीचे महेश नवले, विजय वाकचौरे, संतोष फापाळे यांनी आंदोलनाची भूमिका विशद केली. प्रदीप हासे, नितीन नाईकवाडी, रावसाहेब वाकचौरे, शांताराम संगारे, सुरेश नवले, प्रमोद मंडलिक, नीलेश तळेकर, जालिंदर बोडके, बाळासाहेब आरोटे, अनिल कोळपकर आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Web Title: Akole should not be left out of Pune-Nashik railway line