Ahmednagar Municipal Election : निकालाची उत्सुकता : दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 10:01 IST2018-12-10T09:45:44+5:302018-12-10T10:01:28+5:30
महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ३३९ उमेदवारांचे भवितव्य रविवारी सायंकाळी इलेक्ट्रॉनिक यंत्रात बंद झाले़ सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी बारानंतर चित्र स्पष्ट होईल़

Ahmednagar Municipal Election : निकालाची उत्सुकता : दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार
अहमदनगर : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ३३९ उमेदवारांचे भवितव्य रविवारी सायंकाळी इलेक्ट्रॉनिक यंत्रात बंद झाले़ सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी बारानंतर चित्र स्पष्ट होईल़
महापालिकेच्या ६८ जागांसाठी मतदान घेण्यात आले़ सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती़ रात्री उशिरापर्यंत काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा होत्या़ शहरासह उपनगरातील ३३७ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले़ पोलीस बंदोबस्तात मतपेट्या भवानीनगर येथील वखार महामंडळाच्या गोदामात हलविण्यात आल्या़
काँग्रेस आघाडी, भाजप आणि शिवसेना, या तिन्ही पक्षांनी बहुतांश प्रभागात तुल्यबळ उमेदवार दिले़ त्यामुळे तिरंगी लढती पाहायला मिळाल्या़ या निवडणुकीत भाजपाने प्रथमच प्रचारात आघाडी घेतली़ राष्ट्रवादीने नेत्यांच्या सभा न घेता घरोघरी जाऊन प्रचार केला़ भाजपाच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्र्यांची, तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची सभा झाली़ काँग्रेसकडून डॉ़ सुजय विखे निवडणुकीत सक्रिय होते़ सेनेचे आमदार अनिल राठोड यांनी खिंड लढविली़ राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपने विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढविली़ भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेली तीनशे कोटींची घोषणाही चांगलीच गाजली़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्याक्षणी काँग्रेसचे पाच उमेदवार भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसची नाचक्की झाली़ यासह अनेक मुद्यांवरून ही निवडणूक चांगलीच गाजली असून, नगरकर कुणाला कौल देतात, हे निकालानंतर स्पष्ट होईल़