अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यात एका शाळेत परप्रांतीय कामगाराच्या चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकानेच अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. शिक्षक बळजबरी करत असताना विद्यार्थीने विरोध केला आणि यात ती जखमी झाली आहे. मात्र, ही बाब शिक्षक व गावातील एक नेत्याने दाबण्याचा प्रयत्न केला. याबाबत नागरिकांनी चाईल्ड लाईनकडे तक्रार केली आणि हा प्रकार समोर आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
परप्रांतीय कामगाराची मुलगी चौथीत शिकत आहे. शिक्षकाने तिच्यासोबत गैरवर्तन केले. यात मुलगी जखमी झाली आहे. मुलीच्या पालकांनी ही बाब गावातील एका नेत्याला सांगितली. पण, या नेत्याने गावात राहायचे असेल तर पैसे घेऊन शांत बसा, असे सांगितले. त्यामुळे हे कुटुंब घाबरून गेले.
मग कसे समोर आले प्रकरण?
ही बाब काही सामाजिक कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी ही बाब स्नेहालय संस्थेला कळवली. स्नेहालय संस्थेने चाईल्ड लाईनकडे संपर्क करण्याचा सल्ला दिला आहे. याबाबत ॲड. हरिहर गर्जे यांनी महिला बाल कल्याण विभागाशीही संपर्क केला आहे. महिला बाल कल्याण विभागाने याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले.
शिक्षण विभागाने केली पाहणी
नागरिकांनी हा प्रकार पाथर्डी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिला आहे. पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांनी याबाबत शिक्षकाची चौकशी केल्याची माहिती समजली. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; पण संपर्क झाला नाही.
ही घटना घडल्याचे काही नागरिकांनी आम्हा सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितले. याबाबत मुलीचे पालक दबावाखाली आहेत. आपण ही बाब जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना कळवली आहे. त्यांनी गावात जाऊन चौकशी करू असे सांगितले आहे. याबाबत तत्काळ मुलीची वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक असून, या कुटुंबाला संरक्षण देण्याची गरज आहे, असे किसन आव्हाड यांनी सांगितले.