अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 21:21 IST2025-08-16T21:20:00+5:302025-08-16T21:21:46+5:30
Ahilyanagar Crime: अहिल्यानगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने चार मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं?
Marathi Crime News: पत्नीसोबत झालेल्या वादानंतर पतीने आधी चार मुलांना विहिरीत ढकलले. त्यानंतर स्वतः उडी मारत आत्महत्या केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात ही खळबळ घटना घडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिळालेल्या माहितीनुसार, राहाता तालुक्यातील कोहाळे गावाच्या शिवारात ही घटना घडली. अरुण काळे (वय ३०) असे चार मुलांसह आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कबीर अरुण काळे, (वय ५ वर्ष), वीर अरुण काळे, प्रेम अरुण काळे, शिवानी अरुण काळे अशी मृत मुलांची नावे आहेत. सर्व मुलांचे वय ५ ते ८ वर्षादरम्यान आहे.
पत्नीसोबत वाद अन् कुटुंबच संपवलं
अरुण काळे पत्नी आणि चार मुलांसह राहत होते. काही दिवसांपूर्वी पत्नीसोबत वाद झाला. त्यानंतर पत्नी मुलांना सोडून माहेरी निघून गेली.
पत्नीने पुन्हा नांदायला येण्यास नकार दिला. त्यामुळे अरुण काळे संतापले. त्यानंतर ते शिवारातील एका विहिरीजवळ मुलांना घेऊन गेले. आधी त्यांनी एक मुलगी आणि तीन मुलांना विहिरीत ढकलले. त्यानंतर त्यांनी स्वतः पाय बांधून उडी मारली. या घटनेत पाचही जणांचा मृत्यू झाला.
माहिती मिळाल्यानंतर गावातील लोकांनी विहिरीवर गर्दी केली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला आणि उशिरा तिघांचे मृतदेह बाहेर काढले. दोन जणांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. अरुण काळेंचा मृतदेह एक हात आणि एक पाय एकमेकांना बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.