अहमदनगर : भाजपची सत्ता गेल्याने देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेमधून ते सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून जनतेमध्ये संभ्रम, गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जाते. त्यामुळे शंभर कोटी रुपयांची मागणी करणारे परमवीरसिंग यांच्या आरोपाबाबत तथ्य नसल्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.
खडसे बुधवारी नगरमध्ये होते. औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, एखाद्याचा ठरवून कार्यक्रम करायचा असेल तर त्याला बदनाम केले जाते. मलाही बदनाम केले, तसेच आता गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदनाम केले जात आहे. गत वर्षभर लॉकडाऊन असल्याने सर्वच ठिकाणी आस्थापना बंद होत्या. त्यामुळे शंभर कोटी रुपये कोणाकडे मागितले, हा मोठा प्रश्न आहे. भ्रष्टाचार, गैरव्यवहार नसलाच पाहिजे. मात्र, परमवीरसिंग यांच्या आरोपात तथ्य नाही. बदली झाल्यामुळे आकसापोटी, अन्याय झाला म्हणून आरोप केले जात आहेत. पोलिसांच्या बदल्या हे आस्थापना मंडळ करते. बदल्या मंत्री करूच शकत नाहीत. बदल्यांचे काही नियम आहेत. त्यामुळे पैसे घेऊन बदल्या होतात, याही आरोपात तथ्य नाही.
सत्ता आणायची असेल तर भाजपकडे बहुमत लागते. ते त्यांच्याकडे आहे का? आमची सत्ता येणार आहे, आम्हीच पुन्हा येऊ हे सांगणे म्हणजे भाजपचे आमदार फुटू नयेत, याची काळजी घेण्यासाठी विरोधी पक्षाला असे बोलावे लागते. खोटे बोलणे, बदनाम करणे, संभ्रम निर्माण करणे, गैरसमज निर्माण करणे हे आम्हीही विरोधी पक्षनेते असताना काम केले आहे. मात्र, आजच्यासारखे त्यावेळी राजकारण नव्हते. सध्याच्या विरोधी पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. माझ्यावर कधीच पाच-पन्नास रुपये खाल्ले म्हणून आरोप झाले नाहीत. एका आरोपातून बाहेर पडले की दुसरे झाले. मात्र, त्यात काहीच निष्पन्न झाले नाही, असे खडसे यांनी स्वत:च्या आरोपाबाबत सांगितले.