स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीला लग्नासाठी धमकी; हातात पिस्तुल घेतलेला फोटो दाखवत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:44 IST2025-10-07T19:42:13+5:302025-10-07T19:44:34+5:30
स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या एका तरुणीला रस्त्यात गाठून लग्न कर नाही, तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीला लग्नासाठी धमकी; हातात पिस्तुल घेतलेला फोटो दाखवत म्हणाला...
Ahilyanagar Crime : हातात पिस्तूल घेतलेला फोटो दाखवित स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार रविवारी (५ ऑक्टोबर) घडला. गेल्या आठ वर्षांपासून पाठलाग करून तो तिला त्रास देत होता. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ओंमकार ज्ञानेश्वर सुपेकर (रा. वाणीनगर, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असताना २०१७ मध्ये तरुणीची आरोपीशी ओळख झाली होती. मित्र समजून ती त्याच्याशी बोलत होती.
ती मित्र समजत होती, त्याने लग्नाची स्पप्ने रंगवली
२०२० मध्ये त्याने फोन करून तिला लग्नासाठी मागणी घातली. तिने लग्नास नकार दिला. त्याचा त्याला राग आला. त्याने तरुणीला शिवीगाळ करत दमदाटी केली, तसेच घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे तरुणीने त्याचा मोबाइल नंबर ब्लॅक लिस्टला टाकला, तरीही तो तिला त्रास देत होता.
दुसऱ्यांच्या फोनवरून धमकावत होता. ही बाब तिने घरच्यांना सांगितली. नातेवाइकांनी त्याच्या आई-वडिलांना समजावून सांगितले. त्यांनीही यापुढे असे होणार नाही, अशी खात्री दिली.
रस्त्यात गाठले आणि जीवे मारण्याची धमकी दिली
स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याने ती क्लासला जात होती. २०२३ मध्ये त्याने तिला क्लासच्या समोर गाठले व दुचाकीची चावी घेऊन त्रास दिला. तेव्हापासून तो तिला त्रास देत होता. रविवारी त्याने तिला गाठले. हातात पिस्तूल घेतलेला फोटो दाखवित लग्न कर, अशी धमकी दिली.