Real poverty | खरं दारिद्र्य

खरं दारिद्र्य

विजयराज बोधनकर
दारिद्र्य आणि गरिबी याचा कुठेही सुतराम संबंध नसतो. उलट मनात सतत नकारात्मक विचार येत राहणं हेच खरं त्या मनबुद्धीचं दारिद्र्य असतं. मग तो श्रीमंत असो वा गरीब असो. बरेचदा आर्थिक पोकळीमुळे गरिबी येते, पण कधीच दारिद्र्य येतं नसतं. अनेक गरीब घरात सत्त्वशील माणसं जन्म घेतात व अनेक श्रीमंत घरातही दारिद्र्य पाय रोवून बसलेलं असतं म्हणून गरिबी आणि दरिद्री यात खूप फरक आहे. आर्थिक गरिबी ही सभोवतालच्या परिस्थितीतून जन्म घेत राहते, अनेकांचं शिक्षण परिस्थितीमुळे पूर्ण होत नसतं. या कारणामुळे अनेक संधी हुलकावण्या देतात आणि पुढे आर्थिकतेची घडी बसत नसते, अशी खूप उदाहरणं आहेत. त्याला दारिद्र्य म्हणता येणार नाही. त्याउलट संयत राहून परिस्थितीनुसार बदलत जाणं हे खरं उत्तम जीवन असतं. दारिद्र्य म्हणजे खऱ्या अर्थाने बुरसटलेले विचार घेऊन जगणं. समाधानी माणूस हा कधीच भौतिक सुखाच्या मागे लागत नाही. त्याउलट अतिसमाधानी असणं हेही एक दारिद्र्य असतं. आळस हा जीवनातला मोठा शत्रू आहे. त्याचा त्रास पूर्ण कुटुंबाला होतो. अतिसमाधानी म्हणजे कर्महीन असणं आणि मग त्यातून आलेल्या गरिबीचं कारण ‘नशीब’ असं सांगत बसणं हा त्या सांगणाºयाचा दांभिकपणा असतो. गरज नसताना अति पैशाच्या मागे लागणं हे खरं वैचारिक दारिद्र्य असतं. अतिसुखामुळे मुलांची बौद्धिक, मानसिक क्षमता हळूहळू क्षीण होत जाते. सर्व काही तयार पुढ्यात मिळतं, जगण्यात एक संथपणा येतो आणि अशा अनेक घरांत भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसा घराच्या, आरोग्याच्या नाशाला कारणीभूत ठरत जातो आणि हेच जगण्यातलं मोठं दारिद्र्य म्हणायला हवं. उत्तम लोकांचा सहवास, उत्तम वाचन, उत्तम श्रवण, चिंतन अन् मनन यातून वैचारिक दारिद्र्य नष्ट होत जाऊन शाश्वत आयुष्य पदार्पण करीत राहतं. दारिद्र्य निर्मूलनाचा हाच एकमेव मार्ग असू शकतो.

Web Title: Real poverty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.