शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी २१०० शेतकऱ्यांच्या हरकती, उद्या अंतिम दिवस 

By अशोक डोंबाळे | Published: March 26, 2024 04:59 PM2024-03-26T16:59:29+5:302024-03-26T16:59:46+5:30

विटा, मिरज प्रांताधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांच्या हरकती दाखल

Objection of 2100 farmers for cancellation of Shaktipeeth highway, tomorrow is the last day | शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी २१०० शेतकऱ्यांच्या हरकती, उद्या अंतिम दिवस 

शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी २१०० शेतकऱ्यांच्या हरकती, उद्या अंतिम दिवस 

सांगली : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी घेतल्या जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावे लागणार आहे. म्हणूनच शासनाने शक्तिपीठ महामार्ग रद्द करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशा मागणीच्या याचिका विटा आणि मिरज प्रांताधिकारी कार्यालयाकडे दाखल केल्या आहेत. मंगळवारपर्यंत दोन हजार १०० हरकती दाखल झाल्याची माहिती शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीकडून दिली. गुरुवारपर्यंत (दि. २८) शेतकऱ्यांना हरकती दाखल करता येणार आहेत.

प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गच रद्द झाला पाहिजे, अशी भूमिका घेऊन शेतकऱ्यांनी हरकती घेण्यास सुरुवात केली आहे. सोमवारपर्यंत ६०० हरकती दाखल झाल्या होत्या. मंगळवारी शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे सतीश साखळकर, उमेश देशमुख, महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने मिरजेत हरकती दाखल केल्या.

मिरज तालुक्यातील बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी, कवलापूर, तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, डोंगरसोनी, सिद्धेवाडी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, गव्हाण, मणेराजुरी, सावर्डे, मतकुणकी, नागाव कवठे आदी गावांमधील शेतकऱ्यांनी मिरज प्रांताधिकारी कार्यालयात हरकती दाखल केल्या आहेत.

तसेच विटा प्रांताधिकारी कार्यालयाकडे शेटफळे (ता. आटपाडी) येथील शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या आहेत. मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील सर्व गावांमधून दोन हजार १०० शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या आहेत, अशी माहिती शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे उमेश देशमुख यांनी दिली.

यावेळी प्रभाकर तोडकर, व्ही. पी. भोसले, सुनील पवार, यशवंत हरूगडे, रघुनाथ पाटील, एम. एन. कदम, उदय पाटील, विष्णू पाटील, उमेश एडके, लखन पाटील, किशोर पाटील, अक्षय जाधव, सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Objection of 2100 farmers for cancellation of Shaktipeeth highway, tomorrow is the last day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.