स्त्रियांनी प्रेरणादायी बनावे, अमृता फडणवीस यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 07:21 PM2018-03-22T19:21:25+5:302018-03-22T19:21:25+5:30

प्रत्येक स्त्रीने स्वत:वरील सर्व बंधने झुगारुन स्वत:सह दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी बनावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी अस्त्र फाऊंडेशनच्यावतीने बुधवारी मॅक्सस मॉल येथील बँक्विट हॉलमध्ये महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात दिला.

माजी महापौर गीता जैन यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या अस्त्र फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीस यांनी, प्रत्येक महिलांमध्ये काही ना काही विशेष गुण असतो पण त्या संसारामध्ये स्वत:ला विसरुन जात असल्याने त्यांचा चांगला गुण समाजापर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त केली.

याप्रसंगी राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आ, मनिषा चौधरी, महापौर डिंपल मेहता, केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालयाच्या मंडळ सदस्या रानी द्विवेदी, नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते, ‘दिदि‘ या महिला संस्थेच्या संस्थापिका रेवती रॉय आदी उपस्थित होते.

यावेळी बॉलिवूड गायिका वैशाली सामंत यांच्या ‘लाल मेरी.....’ या गाण्यावर अमृता यांनी देखील सूर छेडला.

कार्यक्रमास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.