Pune Ambil Odha: ऐन पावसात आम्ही कुठं जायचं, अनेक संसार उघड्यावर...न थांबणारे अश्रू अन् आक्रोश!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 12:38 PM2021-06-24T12:38:43+5:302021-06-24T12:42:40+5:30

पुण्याच्या आंबिल ओढा परिसरात आज सकाळपासून झोपडपट्ट्यांवर अतिक्रमण हटवण्याचा कारवाई केली जात आहे. पण यावेळी नागरिक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. पालिकेनं कोणतीही पूर्वकल्पना न देता कारवाई केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

पुण्यातील आंबिल-ओढा परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई आज सकाळपासून सुरू झालीय. यात अनेक जेसीबींच्या माध्यमातून येऊन झोपडपट्टींवर कारवाई केली जात आहे. पण ऐन पावसाळ्यात होणाऱ्या कारवाईनं स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.

कारवाईत नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही नागरिकांनी यावेळी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये झटापटही झाली.

पुण्याचा दांडेकर पुलालगत असलेल्या वस्तीतल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित आहे. या वस्ती मध्ये पुराचे पाणी शिरत असल्याने महापालिकेने हे प्रकरण गांभीर्याने घेत नागरिकांना इथून हटवायची तयारी केली. मात्र यावरून स्थानिक नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आम्हाला कोणतीही सूचना न देता केवळ बिल्डर्स चा फायद्यासाठी ही कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

महापालिकेच्या या कारवाईनंतर एक चिमुकला माध्यमांसमोर आपली व्यथा मांडत होता. सकाळपासूनच प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईनं चिमुकल्याला अश्रू अनावर झाले.

कारवाई पूर्वी पुनर्वसन का करण्यात आलं नाही असा सवाल विचारत नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

कोणतीही पूर्वकल्पना न देता कारवाई केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यामुळे अनेक संसार उघड्यावर आले असून अशा परिस्थितीत आम्ही कुठं जायचं असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे. अनेक घरातील लहान मुलांनाही अश्रू अनावर झाले आहेत.

आंबिल ओढा परिसरातील या १०० गुंठ्याच्या प्लॉटवर शहरातील अनेक बिल्डर्संची नजर असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे.