“BJP ला पराभूत करायचे असेल, तर काँग्रेसने सर्वांत आधी...”; सिब्बलांनी सांगितला रामबाण उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 11:15 AM2021-08-11T11:15:05+5:302021-08-11T11:20:23+5:30

kapil sibal: काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या दिल्लीमधील घरी विरोधकांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीवरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून राहुल गांधी पायउतार झाले.

या घडामोडींनंतर सोनिया गांधी यांना काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेसला आपले गड राखता आले नाहीत. तर आता पुन्हा एकदा आगामी काळात ५ राज्यांतील निवडणुकांमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

राजस्थानसह काही ठिकाणी काँग्रेसमधील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी परखड मत मांडले आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या दिल्लीमधील घरी विरोधकांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसानामित्त आयोजित या डिनर पार्टीत राजकीय चर्चादेखील रंगली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊतदेखील यावेळी उपस्थित होते. या बैठकीवरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर कपिल सिब्बल यांनी काँग्रेस आणि विरोधकांच्या पुढील वाटचालीसंदर्भात भाष्य केले आहे.

कपिल सिब्बल यांना यावेळी गांधींशिवाय विरोधकांना एकत्र आणलं जात आहे का, असे विचारले असता, याचे गांधींशी काही देणेघेणे नाही. या देशातील लोकं आम्हाला प्रश्न विचारत आहेत ते ठीक आहे. आम्ही भाजपविरोधी नाही, पण मग दुसरा पर्याय काय? मला वाटते प्रक्रिया सुरु करण्याची वेळ आली आहे, असे सिब्बल म्हणाले.

बहुजन समाज पार्टी वगळता सर्वजण तिथे उपस्थित होते. चर्चा सुरु करणे हा माझा मुख्य हेतू होता. विरोधकांनी एकमेकांशी बोलण्याची वेळ आली आहे. काँग्रेसला या चर्चेतून वगळलेले नाही. राहुल गांधी पुढाकार घेत असून हा डिनर गांधींसाठी आणि गांधीसोबतच होता, असे सिब्बल यांनी नमूद केले.

राहुल गांधींनी आयोजित केलेल्या ब्रेकफास्ट बैठकीच्या तुलनेत यावेळी जास्त जण उपस्थित होते. विरोधकांची मोठी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, यावर बोलताना सिब्बल म्हणाले की, राहुल गांधींना योग्य वाटत आहे, त्यापद्धतीने ते करत असून आम्ही आमच्या परीने शक्य तसा त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत आहोत.

ओमर अब्दुल्ला यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणले जात आहे ही चांगली गोष्ट आहे. काँग्रेसला जोपर्यंत १२० जागा मिळत नाहीत, तोपर्यंत भाजपाविरोधात पर्याय दिला जाऊ शकत नाही, असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवदीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्रातील मॉडेल देशभरात राबवण्याच्या प्रस्ताव दिल्याबाबत कपिल सिब्बल यांनी सांगितले की, ५२३ मतदारसंघांमध्ये हे करणे अशक्य आहे. पण जरी आम्ही ४०० उमेदवार दिले तरी भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाही. आम्हाला अशाच पद्धतीने एकत्र काम करावे लागेल.

विरोधकांमध्ये मतांतर येऊ फूट पडू शकते. पण प्रयत्न करायला काय हरत आहे. कारण शेवटी आपल्याला देशाचा नाश करणाऱ्यापासून देशाला वाचवायचे आहे. या पक्षाचा १२५ वर्षांचा इतिहास आहे. गेल्या दोन वर्षात पक्षाकडे अध्यक्ष नाही. अध्यक्षांशिवाय पक्षा पुढे कसा जाणार हे मला माहिती नाही. हे कोणाच्या विरोधात नसून पक्षाकडे पूर्णवेळ अध्यक्ष हवा, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले.

आमच्याकडे पार्ट-टाइम अध्यक्षही नाही. सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष आहेत. इतका मोठा इतिहास असणारा कोणता राजकीय पक्ष अध्यक्षांविना पुढील वाटचाल करु शकणार आहे? आम्ही काँग्रेस पक्षासाठी लढत असून आमचा लढा सुरु ठेवू, असे सांगत आम्हाला काँग्रेसला मजबूत करायचे आहे.

त्यासाठी काँग्रसने सर्वात आधी कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या इच्छा समजल्या पाहिजेत. देशातील लोकांना भाजप नको असून, आम्हाला त्यांना पर्याय द्यायचा आहे. असे कपिल सिब्बल यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.