काँग्रेसमध्ये गोंधळात गोंधळ, या सहा महत्त्वाच्या मुद्यांवर सातत्याने लांबतोय निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 11:24 PM2021-07-14T23:24:37+5:302021-07-14T23:34:11+5:30

Congress Politics: एकेकाळी काँग्रेस हा देशाची दिशा आणि दशा ठरवणारा पक्ष होता. मात्र आज हाच पक्ष पक्षांतर्गत छोट्या छोट्या गोष्टींवर निर्णय घेण्यामध्येही गोंधळून गेलेला दिसत आहे. त्यामुळे पक्षामध्ये गोंधळात गोंधळ असे वातावरण आहे.

एकेकाळी काँग्रेस हा देशाची दिशा आणि दशा ठरवणारा पक्ष होता. मात्र आज हाच पक्ष पक्षांतर्गत छोट्या छोट्या गोष्टींवर निर्णय घेण्यामध्येही गोंधळून गेलेला दिसत आहे. त्यामुळे पक्षामध्ये गोंधळात गोंधळ असे वातावरण आहे. पक्षाच्या हायकमांडपासून ते इतर नेत्यांपर्यंत कुणीही कुठल्याही मुद्द्यावर निर्णायक निर्णय घेण्यापूर्वी बैठकांवर बैठका घेण्यात अडकून पडलेले आहे.

एखाद्या भुलभुलैय्याप्रमाणे पक्षातील निर्णय प्रक्रिया गोल गोल फिरत आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आधी शरद पवारांना भेटतात. मग कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भेटतात. त्यानंतर ते राहुल गांधींची भेट घेतात. बैठकांवर बैठका होतात. २०२४ मध्ये मोदींना पराभूत करण्यासाठी आघाडी तयार असल्याची आतली बातमी येते. मात्र नंतर स्पष्ट निर्णय काहीच होत नाही. सध्या काँग्रेस सहा महत्त्वाच्या मुद्यांवर निर्णय घेण्यात अडखळत आहे. ते मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत

लोकसभेमधील काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांना बदलावे की नाही यावरून सध्या काँग्रेसमध्ये चिंतन सुरू आहे. दुसरीकडे भाजपाने कॅबिनेटच्या विस्तारापासून ते राज्यसभेतील नेत्यापर्यंत सर्वांची निवड केली. मात्र काँग्रेसला अद्याप अधिर रंजन चौधरींबाबत अंतिम निर्णय घेता आलेला नाही.

पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. कधी त्यांच्यातील वाद विकोपाला जातो. तर कधी सारे आलबेल असल्याचे चित्र दिसते. मात्र याबाबत पक्ष नेतृत्वाला अद्याप कुठलाही स्पष्ट निर्णय घेता आलेला नाही.

पुढील वर्षी उत्तराखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याची काँग्रेसला संधी आहे. मात्र तिथे पक्षाचा चेहरा कोण असावा याबाबत काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. तिथे हरिश रावत यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही.

राजस्थानमध्ये गेल्यावर्षी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि युवा नेते सचिन पायलट यांच्यात प्रचंड मतभेद निर्माण झाले होते. त्यावेळी सचिन पायलट यांना काही आश्वासने देऊन हायकमांडने शिष्टाई यशस्वी झाल्याचे सांगत सारे काही आलबेल असल्याचे चित्र निर्माण केले होते. मात्र सचिन पायलट यांना दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही. त्यामुळे त्यांची नाराजी वारंवार उफाळून येत असते.

महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने अनेक आढेवेढे घेत शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र इथेही मोठ्या प्रमाणात गोंधळाचे चित्र आहे. येथे २०२४ च्या विधानसभेत काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार की स्वतंत्रपणे याबाबत वेगवेगळी विधाने नेत्यांकडून केली जात आहेत. त्यामुळे इथेही काँग्रेसची कुठलीही भूमिका स्पष्ट होत नाही आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात काँग्रेसचे आणि यूपीएचे नेतृत्व कोण करणार यावरून काँग्रेसमध्ये खूप गोंधळ निर्माण झालेला आहे. एकीकडे शिवसेना शरद पवार यांचे नाव पुढे करत आहे. तर काँग्रेसमध्ये अद्याप काहीच निर्णय होत नाही आहे. राहुल गांधी नेतृत्व करणार की प्रियंका गांधींचा चेहरा पुढे केला जाईल, याबाबतही स्पष्टता झालेली नाही. तीच बाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला आव्हान द्यायचे असेल तर काँग्रेसला पक्षांतर्गत गोंधळ संपवावा लागेल.