हे आहेत भारतीय राजकारणातील सख्खे भाऊ आणि पक्के वैरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 03:34 PM2019-04-09T15:34:50+5:302019-04-09T16:44:49+5:30

राजकारात कुणीही कुणाचा मित्र नसतो आणि कुणी कुणाचा शत्रूही नसतो, असे म्हटले जाते. मग ते एकमेकांचा सख्खे-चुलत भाऊ का असेनात. अगदी पुराणकाळापासून राजकारणात भाऊबंदकी दिसून आली आहे. सध्याच्या भारतीय राजकारणातही सख्ख्या चुलत भावांच्या अशा अनेक जोड्या आहेत ज्यांच्यामध्ये राजकीय वर्चस्वातून निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे विस्तवही जात नाही, अशाच पक्के वैरी बनलेल्या भावांचा घेतलेला हा आढावा.

मुलायम सिंह यादव आणि शिवपाल यादव - समाजवादी पक्षाचे संस्थापक समाजवादी पक्षाचे दोन दिग्गज नेते असलेल्या मुलायम सिंह यादव आणि शिवपाल यादव यांच्यात अखिलेश यादव यांच्या राजकीय पटलावरील उदयानंतर वादाची ठिणगी पडली. अखेरीस या वादात मुलायम यांनी अखिलेश यांची बाजू घेतल्याने शिवपाल यादव यांनी आपला वेगळा पक्ष काढून वाटचाल सुरू केली आहे. तसेच यावेळी लोकसभा निवडणुकीत शिवपाल यादव यांच्या पक्षाने समाजवादी पक्षाविरोधात उमेदवार दिले आहेत.

एम.के. स्टॅलिन आणि एम.के. अलगिरी - दक्षिणेतील प्रमुख नेते असलेल्या एम. करुणानिधी यांच्या द्रमुक पक्षावरील वर्चस्वावरून स्टॅलिन आणि अलगिरी यांच्यात शितयुद्ध सुरू आहे. करुणानिधी यांच्या अखेरच्या काळातही दोन्ही भावांना एकमेकांपासून दूर राहणेच पसंत केले.

दिग्विजय सिंह आणि लक्ष्मण सिंह - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि त्यांचे बंधू लक्ष्मण सिंह यांच्यात मतभेद झाले होते. त्यानंतर लक्ष्मण सिंह हे भाजपात दाखल होऊन दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

गुलाम नबी आझाद आणि गुलाम अली आझाद - काँग्रेसचे काश्मीरमधील ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि त्यांचे बंधू गुलाम अली आझाद यांच्यातही राजकीय वर्चस्वावरून मतभेद आहेत. त्यामुळे गुलाम नबी आझाद हे काँग्रेसशी निष्ठावंत राहिले, तर गुलाम अली आझाद हे भाजपाकडून निवडणूक लढवतात.

अखिलेश आणि प्रतीक यादव - मुलायम सिंह यांचे पुत्र आणि एकमेकांचे सावत्र भाऊ असलेल्या अखिलेश यादव आणि प्रतीक यादव यांच्यात राजकीय वारशावरून वाद धुमसत आहे. त्यामुळे समाजवादी पक्षावर अखिलेश यांनी पकड मिळवल्यानंतर प्रतीक यादव आणि त्यांच्या पत्नी सपापासून दूर झाल्या. आता प्रतीक यांच्या पत्नी अपर्णा यादव या शिवपाल यादव यांच्या पक्षात सहभागी झाल्या आहेत.

तेजस्वी आणि तेजप्रताप यादव - लालूप्रसाद यादव यांचे दोन्ही सुपुत्र तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्यात राजदवरील वर्चस्वावरून तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. तेजस्वी यादव यांनी सध्या पक्षावर चांगली पकड मिळवली आहे. तसेच लालूंच्या सल्ल्याने सर्व महत्त्वाचे निर्णय तेच घेत आहेत. त्यामुळे बिथरलेल्या तेज प्रताप यांनी लालू राबडी मोर्चा नावाची आघाडी उघडण्याची घोषणा केली होती

राहुल आणि वरुण गांधी - नात्याने एकमेकांचे चुलत बंधू असलेले राहुल आणि वरुण गांधी हे परस्परविरोधी विचारसरणीच्या पक्षांचे प्रतिनिधित्व करत आहेत. एकीकडे राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. तर वरुण गांधी हे भाजपाचे लोकसभा खासदार आहेत. मात्र दोन्ही भाऊ एकमेकांविषयी एक अक्षरही उच्चारत नाहीत.

शहझाद आणि तहसीन पुनावाला - शहझाद पुनावाला आणि तहसीन पुनावाला हे बंधूही काही काळापूर्वीपर्यंत एकमेकांविरोधात होते. मात्र राहुल गांधी यांना आव्हान दिल्यानंतर शहझाद काँग्रेसमध्ये एकाकी पडले आहेत.

उद्धव आणि राज ठाकरे - बंधुभावापासून भाऊबंदकीपर्यंतचा अनुभव घ्यायचा असेल तर उद्धव आणि राज ठाकरेंकडे पाहावे लागेल. उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची सर्व सूत्रे गेल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली. तेव्हापासून दोन्ही भावांमध्ये तीव्र मतभेदांना सुरुवात झाली. आज उद्धव आणि राज ठाकरे हे एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. मात्र कौटुंबिक प्रसंगात दोन्ही भाऊ एकमेकांच्या भेटीगाठी घेतात.