Flash Back जानेवारी २०१४

By admin | Published: December 12, 2014 12:00 AM2014-12-12T00:00:00+5:302014-12-12T00:00:00+5:30

लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या सुरुवातीच्याच जनमत चाचण्यांमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा सत्ता स्थापन करेल असे भाकीत वर्तवण्यात आले जे पुढे खरे ठरले.

दिल्लीत मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील रस्त्यावर उतरुन धरणे आंदोलन केले. केजरीवाल अजुनही विरोधी कार्यकर्त्याच्या मानिसकतेत असल्याची टीका झाली.

सुप्रीम कोर्टाने समलैंगिक संबंधांना बेकायदेशीर ठरवणारा निकाल दिला.

काँग्रेसने राहुल गांधी यांच्याकडे लोकसभा निवडणुकीची धूरा सोपवली व लोकसभा निवडणूक नमो विरुद्ध रागा यांच्यामध्येच रंगणार हे स्पष्ट झाले.

तत्कालीन केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीतील लीला हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. तीनच दिवसांपूर्वी पुष्कर यांनी थरूर यांच्याशी बिनसल्याचे सांगणारे व थरूर यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्याशी संबंध असल्याचे ट्विट केले होते व नंतर ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचा खुलासाही त्यांनी केला होता. पुष्कर यांच्या मृत्यूचे गुढ अजुनही कायम आहे.

गुजरातमधील पतंग महोत्सवात पंतप्रधानपदाचे उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसोबत अभिनेता सलमान खानने हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

कोल्हापूरमधील टोलविरोधी आंदोलनाने हिंसक वळण घेतले व संतप्त आंदोलनकांनी टोलनाक्याला आग लावली.

कामवालीचा व्हिसा मिळवताना घोटाळा केल्याच्या आरोपाखाली अमेरिकी कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली डिसेंबरमध्ये अमेरिकेत अटक झालेल्या व सर्वांगाची झडती घेत मानहानी झालेल्या भारताच्या अधिकारी देवयानी खोब्रागडे अखेर जानेवारीमध्ये भारतात परतल्या.

नवीन वर्षाची सुरुवात हॉमिओपॅथीच्या डॉक्टरांसाठी आनंदाची ठरली. हॉमिओपथीच्या डॉक्टरांना अ‍ॅलोपथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य सरकारने डॉक्टरांना नववर्षाची भेट दिली.

महाराष्ट्रासाठी नववर्षाची सुरुवात दुःखद बातमीनेच झाली. २ जानेवारी रोजी माळशेज घाटात एसटी बस दरीत कोसळून २७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

व्ही. बालकृष्णन मीरा संन्याल अशा ख्यातनाम मंडळींनी आम आदमी पक्षात प्रवेश केल्याने आपकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. दिल्लीत काँग्रेसच्या पाठिंब्यावरील आपचे अल्पकालीन सरकार जानेवारीतच सत्तेत होते.

२०१४ या वर्षाची सुरुवात झाली ती लोकसभा निवडणुकीचे वेध घेत... मनमोहन सिंग हेच निवडणुकीपर्यंत पंतप्रधान राहतील हे स्पष्ट करण्यात आले तसेच निवडणुकीच्या प्रचाराची धुरा राहुल गांधी सांभाळतील हे देखील स्पष्ट झाले.