Corona Virus : कोरोनाचा हाहाकार! 'या' राज्यात सापडला ओमायक्रॉनचा नवा व्हेरिएंट; लस घेतलेल्यांनाही होतोय संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 02:53 PM2022-08-11T14:53:22+5:302022-08-11T15:14:26+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,26,879 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16,299 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,26,879 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

कोरोनामुळे अनेक राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. संक्रमणाचा दर हा 15 टक्क्यांहून अधिक असून आरोग्य विभागाने देखील चिंता व्यक्त केली आहे. पण आता दिल्लीकरांचं टेन्शन आणखी वाढलं आहे. कारण ओमायक्रॉनचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट दिल्लीतील लोकांना झपाट्याने संक्रमित करत असल्याचं समोर आलं आहे. दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश हॉस्पिटलच्या रिसर्चमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचं नाव BA,2.75 आहे. अहवालात असे आढळून आले की ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटमुळे संक्रमणाचे प्रमाण जास्त असल्याचं म्हटलं जात आहे.

LNJP हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेत 90 कोरोनाबाधित लोकांच्या नमुन्याच्या जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. अहवालात असे दिसून आले आहे की कोरोनाचा हा व्हेरिएंट अतिशय वेगाने पसरतो. ज्या लोकांच्या शरीरात आधीच अँटीबॉडीज आहेत किंवा ज्यांनी कोरोनाची लस घेतली आहे अशा लोकांवरही या प्रकाराचा परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.

एलएनजेपी रुग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉ, सुरेश कुमार यांनी ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हा व्हेरिएंटचा ट्रान्समिशनट रेट जास्त आहे. काही लोक मास्क लावत नाहीत, तर काहींनी अद्यापही लसीचा डोस घेतलेला नाही. यामुळे देखील वेगाने कोरोनाचा प्रसार होत आहे. इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना याचा सर्वाधिक धोका आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दिल्लीमध्ये सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा मास्क सक्ती लागू कऱण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास 500 रुपयांचा दंड बसणार आहे. दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारने खबरदारीच्या दृष्टीने आता पावलं उचलली आहे.

पुन्हा एकदा मास्क सक्ती लागू केली असून सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्तीचे पालन न कऱणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच खासगी चारचाकी गाडीने जर प्रवास करत असाल तर मास्क न घातल्यास दंड आकारला जाणार नाही असं म्हटलं आहे. नियमावलीचं पालन करा असं प्रशासनाच्या वतीने सांगतण्यात येत आहे.

दिल्लीत गेल्या 24 तासांत 2146 रुग्ण आढळले आहेत. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी 2495 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. दिल्लीत कोरोनाचा डेली पॉझिटिव्हीटी दर 15.41 टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.