शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट, ५० दिवस जेल भोगणाऱ्या युवकाला भाजपानं दिलं गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 12:17 PM2023-08-04T12:17:16+5:302023-08-04T12:26:03+5:30

मविआ काळात शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी चर्चेता आलेला युवक अखेर भाजपाचा पदाधिकारी बनला आहे. भाजपाच्या सोशल मीडिया टीममध्ये या युवकाची सहसंयोजकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

निखील भामरे असं या तरूणाचे नाव आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. मविआ काळात निखील भामरे या तरुणावर दिंडोरी, पुणे, बारामती, कळवा अशा विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

निखीलने शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याचा आरोप होता. त्यानंतर त्याला ५० दिवस तुरुंगवासही भोगावा लागला. आता भाजपाने सोशल मीडिया सेलच्या २१ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यात निखील भामरेचा समावेश करण्यात आला आहे.

निखील भामरे या भाजपाने गिफ्ट दिले का अशी चर्चा सुरू झाली आहे. निखीलने शरद पवारांवर लिहिलेल्या पोस्टने बरेच वादंग निर्माण झाले होते. निखीलवर ७ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली होती.

५० दिवसांनी निखील भामरे तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर आता भाजपाने त्याला सोशल मीडिया सेलमध्ये पदाधिकारी बनवून त्याला बक्षिसी दिलीय का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. भामरेच्या नियुक्तीने सगळ्यांना धक्का बसला आहे.

निखीलच्या नियुक्तीवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण ज्यावेळी निखीलने शरद पवारांवर पोस्ट केली होती. तेव्हा त्याचा संबंध भाजपाशी जोडण्यात आला होता. मात्र भाजपाने, निखीलने त्यावेळी त्याचा इन्कार केला होता.

कोण आहे निखील भामरे? – निखील हा नाशिकचा भाजपाचा कार्यकर्ता आहे. त्याने १ वर्षापूर्वी शरद पवारांविषयी पोस्ट करत लिहिली होती. त्यात त्याने वेळ आली आहे बारामतीच्या गांधींसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची अशी धमकी दिली होती.

निखीलच्या या ट्विटचा स्क्रिनशॉट्स काढून जितेद्र आव्हाड यांनी त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी दखल घेत निखीलला नाशिकहून अटक करत ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी निखीलला ५० दिवसांची जेल भोगावी लागली होती.

यातून सुटून आल्यानंतर निखीलने पोस्ट केली होती. त्यात देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले होते. निखीलनं म्हटलं होते की, कठीण काळात देवेंद्र फडणवीस माझ्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले. तुम्ही केलेल्या मदतीचा मी सदैव ऋणी राहील अशा शब्दात त्याने आभार व्यक्त केले होते.

निखील भामरे हा सटाणा येथील कॉलेजमध्ये फार्मसीचा विद्यार्थी आहे. सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टने राज्यात वाद निर्माण झाला होता. त्यावेळी निखील भामरे चर्चेत आला. आता भाजपाने निखीलला पदाधिकारी बनवल्याने पुन्हा तो चर्चेत आला आहे.