CoronaVirus Live Updates : कोरोना रिटर्न्स! चीनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; नव्या व्हेरिएंटचा प्रसार, लावलं लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 12:22 PM2022-10-13T12:22:36+5:302022-10-13T12:39:09+5:30

CoronaVirus Live Updates : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी परत लॉकडाऊन लावण्याचा विचार सरकार करत असून नवीन ट्रॅव्हल गाइडलाइनही जारी करण्यात आल्या आहेत.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरात वेगाने लसीकरण सुरू असून संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान चीनने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे.

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी परत लॉकडाऊन लावण्याचा विचार सरकार करत असून नवीन ट्रॅव्हल गाइडलाइनही जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, चीनमध्ये ओमायक्रॉनचे दोन नवे व्हेरिएंट आढळले आहेत.

बीएफ.7 आणि बीए.5.1.7 या दोन नवीन व्हेरिएंटमुळे चीनमध्ये अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 10 ऑक्टोबरला चीनमध्ये कोरोनाचे 2089 रुग्ण समोर आले होते. 20 ऑगस्टनंतरचा हा सगळ्यात मोठा आकडा आहे. तर, चीनच्या Shenzhen परिसरात बीएफ.7 व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तिथंही रुग्णांच्या संख्येत तीनपटीने वाढ झाली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाने नवीन नियम लागू केले आहेत. Shenzhen मध्ये बाहेरुन नागरिक आल्यानंतर तीन दिवसांच्या आतच त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. तसंच तिथली स्थिती इतकी गंभीर आहे की शाळा व थिएटरही बंद करण्यात आले आहेत.

चीनमध्ये कोरोना संसर्ग पुन्हा वाढला आहे. त्यासाठी अनेक कारण समोर येत आहेत. चीनमध्ये आठवडाभर चालणाऱ्या एका राष्ट्रीय कार्यक्रमासाठी नागरिक एका शहरातून दुसऱ्या शहरात जात होते. त्यामुळे कोरोना व्हायरसाचा प्रसार ही अधिक वाढल्याचं म्हटलं जात आहे.

कोरोनाच्या ओमायक्रॉन या सब व्हेरिएंटमुळे जगभरात कोरोनाची लाट आल्याचं पाहायला मिळालं आहे. यूके आणि जर्मनीमध्येही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. या व्हेरिएटबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. तज्ज्ञांच्या मते, या व्हेरिएंटमुळे रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. पण त्याची गंभीर लक्षण अद्याप दिसलेली नाहीत.

चीन अद्यापही झिरो कोविड रणनितीवर काम करत आहेत. तिथे सातत्याने चाचण्या करण्यात येत आहे. रुग्ण वाढल्यानंतर लॉकडाऊन लावण्यात येते. मात्र, आता रुग्ण वाढले आहेत. एकाच दिवसात रुग्णसंख्या दोन हजारांवर गेली आहे. चीन कोरोनाचा फैलाव होऊ देणार नाही. मात्र, ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होतो आणि मृत्यूदरही अधिक आहे.

लसीकरणानंतरही हाँगकाँग आणि ऑस्ट्रेलियामध्येही अशीच परिस्थिती आहे. सीसीटीव्ही चॅनेलने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने चीनच्या शांक्सी प्रांतातील फेनयांग शहरात लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 62 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 628,402,069 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे 6,565,833 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 607,688,691 जण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.