'ही' मिसळ खाऊन येईल तर'तर्री'.... मुंबईतल्या खवय्यांसाठी खास स्पॉट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 05:30 PM2018-03-26T17:30:08+5:302018-03-26T17:30:08+5:30

मुंबईत हल्ली अनेक ठिकाणी मिसळ महोत्सव होऊ लागलेत. त्याला होणारी गर्दी पाहता, मुंबईकरांचं मिसळप्रेम सहज लक्षात येऊ शकतं. अशा मिसळप्रेमी खवय्यांसाठी काही खास स्पॉट्स... इथली मिसळ खायलाच पाहिजे बॉस!

गिरगावमधील विनय हेल्थ होम म्हणजे खादाड मंडळींसाठी नंदनवनच. इथली मिसळ खरोखरच एक नंबर. विनयची उसळ चटकदार असतेच, पण त्यासोबत दिला जाणारा चिवडा तिला वेगळ्याच उंचीवर नेतो.

नगरकरांची मनं जिंकणारे मारुतीराव मिसळवाले मिसळ-पुरीची आपली स्पेशल डिश घेऊन मुंबईकरांच्या सेवेतही रुजू झालेत. लोअर परेल इथं त्यांचं देखणं हॉटेल नजरेत भरतं. मिसळ-पाव खाणाऱ्या मुंबईकर खवय्यांना त्यांची मिसळ-पुरीही भलतीच पसंत पडलीय.

पूर्वीच्या गिरणगावातील - अर्थात लालबाग-परळमधील खवय्यांचं हक्कांचं ठिकाण म्हणजे लाडूसम्राट. इथल्या मिसळीची चव जरूर चाखायला हवी.

सीएसएमटी स्टेशनच्या बरोब्बर समोर असलेल्या आराम नावाच्या छोट्याशा हॉटेलनं कित्येकांच्या पोटाला आधार दिलाय. आरामचा वडा पाव चांगलाच हिट आहे, पण त्यांच्या मिसळीनंही अनेकांचं दिलखुश करून टाकलंय.

प्रकाशची मिसळ म्हणजे 'क्या बात है', हे वाक्य तीन पिढ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतं, यातूनच तिचं माहात्म्य सहज लक्षात येतं.

दादरच्या 'आस्वाद'मधील स्वादाचं काय वर्णन करावं. कुठल्याही मराठमोळ्या पदार्थाचं नाव घ्या, तो आस्वादमध्ये हमखास मिळतो. इथली मिसळही लाजवाब. तिची ख्याती जगभर पोहोचली आहे.

गिरगावातील 'कोल्हापुरी चिवडा' या प्रसिद्ध हॉटेलमधील मिसळही 'टेस्ट में बेस्ट'च आहे.

चेंबूरचं भट विश्रांती गृह दिसायला अगदीच साधं, पण इथल्या मिसळीची चव जिभेवर रेंगाळते.

वांद्र्यातील मातोश्री क्लबसमोरच्या अमेय रेस्टॉरंटमधील मिसळीची चव आईच्या हातच्या चवीसारखीच मनात घर करते.