सुरू करायचाय तुम्हाला स्वत:चा व्यवसाय? 'या' सरकारी स्कीममध्ये मिळेल १० लाखांपर्यंतचं कर्ज, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 08:42 AM2024-04-10T08:42:40+5:302024-04-10T08:52:57+5:30

PM Mudra Yojana Scheme: केंद्र सरकार स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. विशेषत: तरुणांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्यासाठी काही योजना आहेत.

PM Mudra Yojana Scheme: केंद्र सरकार स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. विशेषत: तरुणांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्यासाठी काही योजना आहेत. अशीच एक सरकारी योजना म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना (PM Mudra Yojana), ज्यामध्ये केंद्र सरकार कोणत्याही हमीशिवाय १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देत आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रियादेखील खूप सोपी आहे. कोट्यवधी लोकांनी या स्कीमचा फायदा घेतला आहे.

कर्जाची तीन प्रकारात विभागणी केली आहे- प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत केंद्र सरकार ग्रामीण भागात बिगर-कॉर्पोरेट लघुउद्योग सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी कर्ज देते. म्हणजेच, जर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर या योजनेद्वारे तुमचं काम खूप सोपं होईल. पीएम मुद्रा योजनेंतर्गत उपलब्ध कर्जाची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये शिशू कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण कर्जाचा समावेश आहे. ८ एप्रिल २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्कीमची सुरुवात केली होती.

शिशू कर्जांतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जातं. तर किशोर कर्जांतर्गंत ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जातं. त्याचसोबत तरुण कर्जांतर्गत ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जातं.

पीएम शिशू मुद्रा कर्ज योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही गॅरेंटरची आवश्यकता नाही किंवा त्यासाठी कोणतेही शुल्क भरावं लागणार नाही. वेगवेगळ्या बँकांमध्ये कर्जाच्या व्याजदरांमध्ये फरक असू शकतो. हे बँकांवर अवलंबून आहे. या योजनेंतर्गत वार्षिक ९ ते १२ टक्के व्याजदर आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. पीएम मुद्रा कर्ज कर्जाची प्रक्रिया देखील खूप सोपी आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेला भेट द्यावी लागेल. या सरकारी योजनेसाठी घरी बसूनही अर्ज करता येतो. अनेक बँकांनी अर्ज करण्याची ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही https://www.mudra.org.in/ वर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.

पीएम मुद्रा योजनेंतर्गत लहान दुकानदार, फळे, अन्न प्रक्रिया युनिट यासारख्या छोट्या उद्योगांसाठी कर्जाची सुविधा मिळू शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, निवासी पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, व्यवसाय प्रमाणपत्र आवश्यक आहे.

मुद्रा कर्जासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत- व्यवसाय योजना, अर्ज, पासपोर्ट आकाराचा फोटो, केवायसी कागदपत्रे, ओळखीचा पुरावा, राहण्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा.

बँकांव्यतिरिक्त, मुद्रा लोन या कर्ज देणाऱ्या संस्थांद्वारे उपलब्ध होईल: सरकारी सहकारी बँक, रिजनल सेक्टर ग्रामीण बँक, मायक्रो फायनान्स संस्था, बँकांव्यतिरिक्त इतर वित्तीय कंपन्या.