Jagannath Rath Yatra 2021: जगन्नाथ रथयात्रा आणि मंदिराची ‘ही’ १० अद्भूत रहस्य माहितीयेत का? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 12:10 PM2021-07-12T12:10:45+5:302021-07-12T12:21:36+5:30

Jagannath Rath Yatra 2021: भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले जगन्नाथ पुरीचे मंदिर हे जगभरात प्रख्यात आहे. या मंदिराशी, रथयात्रेशी निगडीत अनेक तथ्ये, रहस्ये जितकी अद्भूत आहेत, तितकीच ती अचंबित करणारी आहेत.

आपल्या देशात जम्मू काश्मीरमधील माता वैष्णो देवीपासून ते तामिळनाडूतील रामेश्वरपर्यंत हजारो मंदिरे असल्याचे पाहायला मिळते. बहुतांश मंदिरांचे यात्रोत्सव, जत्रोत्सव भाविकांसाठी पर्वणी मानली जाते. (10 amazing facts of jagannath temple)

बहुतांशी मंदिरांची परंपरा, जत्रा, उत्सव मोठ्या प्रमाणात आणि भक्तिभावाने साजरे केले जातात. त्यातीलच एक म्हणजे जगन्नाथ पुरीचे मंदिर. या मंदिराशी, रथयात्रेशी निगडीत अनेक तथ्ये, रहस्ये जितकी अद्भूत आहेत, तितकीच ती अचंबित करणारी आहेत. जगन्नाथ रथयात्रा ही आषाढ द्वितीयेपासून सुरू होते. (jagannath rath yatra 2021)

या रथयात्रेची सांगता आषाढी एकादशीला होते. भगवान श्रीकृष्ण, बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा रथारूढ होऊन नगर भ्रमण करतात. या यात्रेत प्रतिवर्षी सुमारे किमान ८ लाख भाविक सहभागी होत असतात. मात्र, गतवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी जगन्नाथ रथयात्रेवर कोरोना संकटाचे सावट असून, मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत यात्रेची परंपरा जोपासली जाणार आहे.

हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर एक आहे. शास्त्र आणि पुराणांमध्ये भगवान विष्णूचे २४ अवतार सांगितले गेले आहेत. त्यातीलच एक अवतार म्हणजे भगवान जगन्नाथ असल्याचे सांगितले जाते. भारतावरील परकीय आक्रमणांचा इतिहास सर्वांनाचा माहिती आहे.

याच एका आक्रमणामुळे जगन्नाथ मंदिर परिसर सुमारे १४४ वर्षे बंद होते. दररोजचे पूजनही बंद होते. मात्र, आद्य शंकराचार्यांनी हे मंदिर खुले केले आणि दररोजची पूजाही सुरू केली. तेव्हापासून आतापर्यंत जगन्नाथ मंदिराची परंपरा कधीही खंडीत झालेली नाही. सन १८७६ मध्ये या भागात प्रचंड दुष्काळ पडला होता. त्या प्रतिकूल परिस्थितीतही यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

जगन्नाथ पुरी मंदिराविषयी अनेक रहस्ये, मान्यता असल्याचे सांगितले जाते. ओडिशा राज्यातील पुरी येथे भगवान जगन्नाथ यांचे भव्य मंदिर आहे. या मंदिराची उंची २१४ फूट आहे. या मंदिराच्या मुख्य घुमटाची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळेला अदृश्य असते.

जगन्नाथ यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊ जनकपुरी येथे समाप्त होते. भगवान जगन्नाथाच्या या मंदिराची उभारणी १० व्या शतकात झाली होती, असे सांगितले जाते. जगन्नाथ मंदिरावरील लावलेला ध्वज नेहमीच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. एवढेच नव्हे, तर या मंदिरावरील ध्वज दररोज बदलला जातो, असे म्हटले जाते.

या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या सिंहद्वारेतून पहिले पाऊल आत टाकताच समुद्राच्या लाट्यांचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही. मात्र, आपण मंदिराच्या बाहेर पाऊल टाकले की, समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. सायंकाळी हा आवाज स्पष्टपणे ऐकू शकतो आणि अनुभवू शकतो, असे सांगितले जाते.

या मंदिरावरून एकही पक्षी किंवा विमान उडताना दिसून येत नाही. जगन्नाथ मंदिर परिसरात असलेल्या एका विशेष चुंबकीय शक्तीमुळे असे घडत असल्याची मान्यता आहे. भगवान जगन्नाथांच्या मूर्तींना प्रत्येक १२ वर्षांनंतर नवलेपन केले जाते.

प्राथमिक प्रक्रिया पार पडल्यानंतर देवळातील पुजारी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतात. नवलेपनाची उत्तर प्रक्रिया कोणीही पाहू शकत नाही. वलेपनाची प्रक्रिया सुरू असते, तेव्हा देवतेच्या हृदयाची धडधड ऐकू येते, असा अनुभव पुजारी सांगतात.

जगन्नाथ मंदिरात वर्षभर अन्नछत्र सुरू असते. मात्र, येथे बनत असलेला प्रसाद कधीही वाया जात नाही. दररोज लक्षावधी भाविक प्रसादाचा लाभ घेत असतात, असे सांगितले जाते. भगवान जगन्नाथाच्या रथांची भव्यता मोहून टाकणारी आहे. या सर्व रथांचे संपूर्ण बांधकाम लाकडी असते.

या रथयात्रेत बलराम हे थोरले बंधू असल्यामुळे त्यांचा रथ सर्वांत पुढे असतो. याला तालध्वज, असे म्हटले जाते. मध्यभागी सुभद्रेचा रथ असतो, याला दर्पदलन किंवा पद्मा रथ, असे संबोधले जाते. सर्वांत शेवटी भगवान श्रीकृष्णांचा रथ असतो. याला नंदी घोष किंवा गरुड ध्वज, असे म्हटले जाते.

दोन्ही भावांची लाडकी बहीण सुभद्रा दोन भावांची संरक्षणात यात्रा करते, अशी मान्यता आहे. या रथांपैकी जगन्नाथाचा १६ चाके असलेला लाकडी रथ हा ४५ फूट उंच, ३५ फूट लांब आणि ३५ फूट रुंद अशा आकारमानाचा असतो. बलरामांचा रथ ४५ फूट उंच असतो. तर, सुभद्राच्या रथाची उंची ४३ फूट असते.

जगन्नाथांचे भाविक केवळ भारतातच नाही, तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर आहेत. जगन्नाथाची मुख्य यात्रा पुरी येथे होत असली, तरी देशभरातील अनेक राज्यांमध्ये या यात्रेचे आयोजन केले जाते. केवळ भारतातच नाही, तर परदेशातही या यात्रेचे आयोजन केले जाते.

भारतात गुजरात, आसाम, जम्मू, दिल्ली, आंध्र प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमधील काही शहरांत या यात्रेचे आयोजन केले जाते. जागतिक पातळीवर बांगलादेश, सॅन फ्रान्सिस्को, लंडन यांसह अनेक देशांमध्ये ही यात्रा काढली जाते.

Read in English