नव्या कारमध्ये हे फिचर्स आहेत का अवश्य पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 02:06 PM2018-12-24T14:06:15+5:302018-12-24T14:15:53+5:30

जर तुम्ही नवीन कार घ्यायला जात असाल तर ती कार कालबाह्य आहे का हे पाहणे गरजेचे ठरेल. कारमध्ये नवीन डिझाईन, रंग, मायलेजसह अन्य असे काही फिचर्स असतात जे तुम्हाला दैनंदिन वापरात येतातच शिवाय ते असणे गरजेचेही आहे.

रिव्हर्स पार्किंग सेन्सर हे फिचर गाडीसाठी महत्वाचे आहे. काही लोकांचे असे मानने असते की जर तुम्हाला गाडी नीट मागे घेता येत नसेल तर चालवायचीच नाही. गाडी पाठीमागे घेत असताना कोणतीही वस्तू किंवा भींत आल्यास सेन्सर याची सूचना आवाजाद्वारे देतात. यामुळे मागे आदळण्याची घटना टळते. रिव्हर्स पार्किंग सेन्सरसर कॅमेरा असल्यास पाठीमागे काय आहे हे दिसते.

डे-नाईट मिरर हा देखील एक महत्वाचा भाग आहे. आयएरव्हीएम म्हणजेच कारमध्ये असलेला पाठीमागे पाहण्याचा आरसा. हा डे नाईट असावा. पाठीमागून येणाऱ्या कार बऱ्याचदा हाय बीमचा वापर करतात. यामुळे त्यांचा प्रकाश थेट चालकाच्या डोळ्यात परावर्तित होतो. यामुळे अपघात होऊ शकतो. यासाठी डे-नाईट मिरर असल्यास थेट प्रकाश डोण्यात पडत नाही. तसेच नेहमी लो बीमचा वापर करावा.

सध्या अॅटोमॅटीक स्लायडिंग विंडो येतात. किमान पुढील बाजुला तरी असतात. यापैकी चालकाकडची विंडो खाली करताना एकदाच बटन दाबताच पूर्ण खाली जाणारी असावी. यासाठी खाली होईपर्यंत बटन दाबून ठेवावे लागू नये. हे फिचरही खूप उपयोगाचे आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअरबॅग खूप महत्वाचा भाग आहे. नव्या नियमांनुसार कारमध्ये चालकाला एअरबॅग असणे गरजेचे आहे. मात्र, प्रवाशांसाठीदेखील एअरबॅग असल्यास उत्तम. बऱ्याचदा ड्रायव्हरच्या बाजुला प्रिय व्यक्ती बसलेली असते. यामुळे कमीतकमी दोन एअरबॅग असलेली कार घ्यावी.

एबीएस ही प्रणाली गाडीमध्ये असणे गरजेचे आहे. शिवाय इबीडी असल्यास आणखी चांगल्या प्रकारे कार कंट्रोल करता येते. अचानक ब्रेक लावायचा झाल्यास कार न घसरता थांबते. मात्र, एबीएस असले म्हणजे कशीही गाडी पऴवायची नाही. ड्रायव्हिंग सावधानतेने करणे गरजेचे आहे.

सुरक्षेसाठी सेंट्रल लॉकिंग सिस्टिमही खूप गरजेची आहे. या फिचरमुळे एका बटनावर सर्व दरवाजे लॉक होतात. यामुळे अपघाताने दरवाजा उघडण्याची शक्यता कमी होते.

अॅडजेस्टेबल स्टिअरिंग व्हील असणेही आवश्यक आहे. यामुळे कमी उंचीच्या व्यक्तींना चांगल्याप्रकारे वाहन चालविता येऊ शकते. लाँग ड्रायव्हिंगसाठी हे फिचर आरामदायी.

फॉगलाईट असणेही गरजेचे आहे. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात धुके असल्याने समोरचे दिसण्यासाठी ही लाईट उपयोगी ठरतेय. एलईडीपेक्षा पिवळसर प्रकाश देणारी लाईट असावी.