मानवतमध्ये ५ दिवसांत ७०० क्विंटल हरभरा खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 07:23 PM2018-05-11T19:23:39+5:302018-05-11T19:23:39+5:30

बाजार समितीच्या परिसरात सुरू असलेल्या शासकीय हमीभाव खरेदी  केंद्रावर ८ मेपर्यंत ४९ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचा ७०४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे़ 

Buy 700 quintals of gram in Manavat within 5 days | मानवतमध्ये ५ दिवसांत ७०० क्विंटल हरभरा खरेदी

मानवतमध्ये ५ दिवसांत ७०० क्विंटल हरभरा खरेदी

Next
ठळक मुद्दे८ मेपर्यंत ६५० शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी केली आहे़ ८९२ शेतकऱ्यांचे अर्ज आॅनलाईन नोंदणीसाठी खरेदी  -विक्री संघामध्ये दाखल झाले

मानवत (परभणी ) : येथील बाजार समितीच्या परिसरात सुरू असलेल्या शासकीय हमीभाव खरेदी  केंद्रावर ८ मेपर्यंत ४९ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचा ७०४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे़ 

तालुक्यात सोयाबीन, तूर पिकापाठोपाठ हरभरा उत्पदनाचा तिसरा क्रमांक आहे़ यावर्षी रबी हंगामात एकूण लागवड क्षेत्राच्या ५ हजार ६० हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा करण्यात आला होता़ कमी पाणी पाळ्यामध्ये पीक हाती येत असल्याने गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे़ नेहमीप्रमाणे भरपूर उत्पन्न हातात येताच बाजारपेठेत भाव कोसळले आहेत़ 

सद्यस्थितीत बाजारपेठेत २ हजार ८०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटल हरभरा विक्री होत आहे़ शासनाचा हमीभाव ४ हजार ४०० रुपये एवढा असून, हमीभावापेक्षा एक ते दीड हजार रुपये कमी मिळत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे़ हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्री करण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरला नाही़ येथील हरभरा खरेदी केंद्रावर २१ मार्चपासून नोंदणी सुरू करण्यात आली होती़ 

८ मेपर्यंत ६५० शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी केली आहे़ तर ८९२ शेतकऱ्यांचे अर्ज आॅनलाईन नोंदणीसाठी खरेदी  -विक्री संघामध्ये दाखल झाले आहेत़ येथील बाजार समिती परिसरामध्ये ३ मेपासून हरभरा खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. ८ मेपर्यंतच्या ५ दिवसांमध्ये  ७०४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे़ बाजारपेठेत खाजगी व्यापारी २ हजार ८०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने हरभरा खरेदी करीत असल्याने चार पैसे जास्त मिळतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्रीसाठी शेतमालाचा घरी  साठा करुन ठेवला आहे़ शेतकरी सध्या खरेदी केंद्रावरून हरभरा विक्रीसाठी आणण्याचा एसएमएस येण्याची वाट पाहत आहेत़ दिलेल्या मुदतीत हरभरा विक्री होते की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

दीड हजार शेतकऱ्यांची नोंदणी
तालुक्यात हरभरा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे़ येथील तालुका खरेदी-विक्र्री संघाच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी गर्दी केली होती़ ८ मेपर्यंत १ हजार ५४२ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी खरेदी-विक्री संघाकडे अर्ज केले आहेत़ त्यापैकी ६५० शेतकऱ्यांचे आॅनलाईन अर्ज अपलोड केल्याची माहिती खरेदी-विक्री संघाने दिली आहे़ नोंदणी झालेल्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचा आकडा पाहता दिलेल्या मुदतीत हरभरा खरेदी होणे अपेक्षित आहे़ 

खाजगी व्यापाऱ्यांना २ हजार क्विंटलची विक्री
शेतकऱ्यांच्या घरात आलेला शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल होत आहे़ असे असताना बाजारात आवक सुरू होताच दरामध्ये घसरण झाली आहे़ गरज असलेल्या शेतकऱ्यांनी पडेल भावात व्यापाऱ्यांना हरभरा विक्री केला आहे़ ५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत शेतकऱ्यांनी १ हजार ९४८ क्विंटल हरभऱ्याची विक्री खाजगी व्यापाऱ्यांना  केली आहे़ बाजारपेठेत उठाव नसल्याने शेतकऱ्यांना एक ते दीड हजार रुपये प्रतिक्विंटल दराने हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला आहे़ याचा आर्थिक फटका सहन करावा लागला़ 

Web Title: Buy 700 quintals of gram in Manavat within 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.