नावाला पावसाळा, झळा मात्र उन्हाळ्याच्या!; वैजापूर तालुक्यातील जिरी गावात पिकांबरोबर मनेही करपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:56 PM2018-08-22T13:56:34+5:302018-08-22T13:57:48+5:30

पावसाळ्यातही पाण्याच्या थेंबासाठी आतूर झालेले गावकरी सुन्न मनाने जीवन जगताहेत.

monsoon for saying, but feelings like summer; In Jiri village of Vaijapur taluka, the crops were burnt | नावाला पावसाळा, झळा मात्र उन्हाळ्याच्या!; वैजापूर तालुक्यातील जिरी गावात पिकांबरोबर मनेही करपली!

नावाला पावसाळा, झळा मात्र उन्हाळ्याच्या!; वैजापूर तालुक्यातील जिरी गावात पिकांबरोबर मनेही करपली!

googlenewsNext

- मोबीन खान 

वैजापूर (जि. औरंगाबाद) : जुलै महिन्यातच पिके करपून गेल्यानंतर गावातील शेतकरी शेताकडे फिरकलेच नाहीत. शेतात जाऊन काय बघायचं, सुकलेल्या पिकांच्या काड्या ! त्यापेक्षा शेतात न गेलेले बरे. उजाड पीक आणि उजाड रान, त्यात उन्हाचे चटके. जमिनीला भेगा पडलेल्या. गावात पाण्याचे टँकर कधी येते कधी नाही. शेतीची कामे नसल्याने हात रिकामे. गावात रोजगार नाही. खायचं काय, पावसाळ्यातही पाण्याच्या थेंबासाठी आतूर झालेले गावकरी सुन्न मनाने जीवन जगताहेत. हे भीषण वास्तव आहे, वैजापूर तालुक्यातील जिरी या छोट्याशा गावचे.

दोन महिन्यांपासून पावसाने खंड दिल्याने जिरी या लहानशा गावातील तब्बल १८०० हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके धोक्यात आली आहेत. दुबार पेरणी करुनही पिके येण्याची आशा मावळल्याने येथील शेतकरी हताश झाला आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई पाचवीला पुजलेली आहे.   या परिसरातील एकुलत्या एक ढेकू तलावातसुद्धा पाण्याचा थेंब नाही. गेल्या गुरुवारी, शुक्रवारी व नंतर काल सोमवारपासून कोसळणाऱ्या हलक्या श्रावणसरींमुळे पावसाळा असल्याचे जाणवत आहे. या सरींनी उकाडा तेवढा कमी झाला, बाकी दुष्काळाची दाहकता कायम आहे. 

डोंगरथडी भागातील या गावाची लोकसंख्या १२००. उदरनिवार्हासाठी शेतीशिवाय दुसरे साधन नाही. यावर्षी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने शिवारातील १८०० हेक्टर क्षेत्रावर कपाशी, मका, सोयाबीन, तूर, मूग, भुईमूग आदी पिकांची पेरणी झाली. पण त्यानंतर पाऊस गायब झाला. या महिन्यात झालेल्या पावसाने कपाशी, मका, बाजरी आदी पिकांना जीवदान मिळाले असले तरी सरासरी उत्पन्नात घट होणार आहे. एक मेपासून गावात पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने टँकर सुरु केले आहे. पण या टँकरद्वारे दोन ते तीन दिवसांनी कुटुंबाला दोनशे लिटर पाणी मिळते. यावर तहान कशी भागणार, हा या गावकऱ्यांचा सवाल. 

रोजगारासाठी शहराकडे धाव
उजाड रानाकडे पाहताना भाकरीचा चंद्र कसा शोधणार याची चिंता बळीराजाला सतावत असल्याचे भीषण वास्तव डोंगरथडी भागातील जिरी गावची पाहणी केल्यानंतर समोर आले. पिकांची निराशा, पाणीटंचाई व निसर्गाची अवकृपा यामुळे अनेकांनी गाव सोडून रोजगाराच्या शोधासाठी शहराकडे धाव घेतली आहे. 

जिल्हाधिकारीही धावले
कृषी विभागातर्फे या परिस्थितीचा अहवाल पाठविल्यानंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, तहसीलदार सुमन मोरे व कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने ८ आॅगस्ट रोजी या गावाला भेट दिली. त्यावेळी गावकऱ्यांनी पथकापुढे समस्यांचा पाढाच वाचला. पंचनामा केल्यानंतर अहवाल पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या. परंतु प्रशासनातर्फे पुढचे कुठलेच पाऊल उचलले गेले नाही. 

काम नाही अन् पाणीही नाही
शेतीची कामे ठप्प झाल्याने शेतकऱ्यांच्या हातांनाही काम नाही. आजूबाजूच्या गावात काम शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. गावात भकास वातावरण पाहायला मिळत आहे. भर पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची जिरीकरांवर वेळ आली आहे, असे सरपंच लहानूबाई कारभारी शिंदे यांनी सांगितले. 

आभुषणे विकण्याची वेळ
गावात लोकांना प्यायला पाणी नाही, तर गुरांना कोठून देणार, पाण्याअभावी गुरे नजरेसमोर तडफडून मरण्यापेक्षा विकण्यास सुरुवात केलेली बरी. पण गुरे विकत तरी कोण घेणार, दारात दुभती गाय आणि आडदांड बैल ही शेतकऱ्यांची आभूषणे समजली जातात. पण शेतकऱ्यांवर ही आभूषणे विकण्याची वेळ आली आहे. दुसरा कोणताच शेतकरी गुरे विकत घेण्यास तयार होईना. आता कसायाकडे गुरे द्यायची का, असा सवाल रावसाहेब चव्हाण यांनी उपस्थित केला. 

Web Title: monsoon for saying, but feelings like summer; In Jiri village of Vaijapur taluka, the crops were burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.