Drought In Marathwada : मराठवाड्यातील शहरांची तहान भागेना !; पाण्याविना नागरिकांचे प्रचंड हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 02:13 PM2019-03-29T14:13:17+5:302019-03-29T14:16:19+5:30

सर्वच जिल्ह्यात मार्च महिन्यातच पाणीबाणी

Drought in Marathwada: Thirsty cities of Marathwada ! Massive citizens are suffers due to without water | Drought In Marathwada : मराठवाड्यातील शहरांची तहान भागेना !; पाण्याविना नागरिकांचे प्रचंड हाल

Drought In Marathwada : मराठवाड्यातील शहरांची तहान भागेना !; पाण्याविना नागरिकांचे प्रचंड हाल

googlenewsNext

30 दिवस पुरेल इतकाच विष्णूपुरीत साठा

नांदेड : साडेसहा लाख लोकसंख्या असलेल्या नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. शहराला आजघडीला दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. विष्णूपुरीत केवळ १६ दलघमी म्हणजे २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यात सध्या होत असलेल्या उपशाचे प्रमाण लक्षात घेता शहराला केवळ महिनाभर पुरेल इतकेच पाणी आहे. यात अवैध पाणी उपसाही सुरू असल्याने नांदेडकरांची चिंता वाढणार आहे. अवैध पाणी उपशावर महापालिका तसेच जिल्हा प्रशासन कोणतेही नियंत्रण ठेवू शकले नाही. त्यासाठी स्थापन केलेली पथके केवळ कागदावरच राहिली आहेत. शहराला पर्यायी पाणीपुरवठा योजनेतूनही पाणी दिले जात आहे. या योजनेसाठी इसापूर प्रकल्पात महापालिकेने १५ दलघमी जलसाठा राखीव ठेवला आहे. त्यातील तीन पाणी पाळी घेण्यात आल्या आहेत.  अन्य दोन पाणी पाळ्याचे नियोजन सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

8 दिवसांआड पाणी मिळत असल्याने औरंगाबादमध्ये हाल 
औरंगाबाद : शहरातील ११५ पैकी ५४ पेक्षा अधिक वसाहतींना मागील काही दिवसांपासून आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. जुन्या शहरातील काही वॉर्डांना चार दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होतोय. पैठणच्या जायकवाडी धरणातून शहरात पाणी आण्यात येते. हे अंतर तब्बल ६० किलोमीटर आहे. जायकवाडी धरणाची पाणीपातळी मागील आठवड्यात मृतसाठ्यात गेली आहे. मृतसाठ्यात दोन वर्षे पुरेल एवढे पाणी असले, तरी महापालिकेला आपतकालीन पंप सुरू करून पाणी आणावे लागते. शहराची गरज २०० एमएलडीची असताना महापालिका फक्त १२५ एमएलडी पाणीपुरवठा करीत आहे. तब्बल ७५ एमएलडीची तूट आहे. शहरातील २५० पेक्षा अधिक वसाहतींना महापालिका ९४ टँकरद्वारे पाणी देत आहे. उन्हाचा पारा वाढताच शहरात पाण्याची मागणीही वाढली आहे. महापालिका समाधानकारक पाणी देऊ शकत नसल्याने नागरिकांना पैसे मोजून खाजगी टँकर मागवावे लागत आहे.

06  दिवसांआड बीडला पाणी 
बीड : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून बीड शहराची तहान भागविण्यासाठी माजलगाव बॅक वॉटर योजना आणि शहरालगत असलेल्या बिंदुसरा धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे आॅक्टोबरपासूनच पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले. सध्या सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असून पुरेसा आहे. २ लाख ३ हजार ४२० इतकी शहराची लोकसंख्या असून दररोज २३ एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे.  पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या माजलगाव व बिंदुसरा धरणातील पाणी जुलैपर्यंत पुरेल असे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.

10  दिवसांआड उस्मानाबादेत मिळते पाणी
उस्मानाबाद : उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तेरणा तसेच रूईभर या दोन्ही प्रकल्पांनी तळ गाठला आहे. त्यामुळे शहराची संपूर्ण मदार आता उजनी प्रकल्पावर आहे. आजघडीला उस्मानाबादकरांना दहा ते अकरा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांनी तळ गाठला आहे. ‘उजनी’तून प्रतिदिन पाच ते सहा ‘एमएलडी’ पाणी उचलले जात आहे. वितरण व्यवस्थेच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने धरणामध्ये ८०० ते ९०० दलघमी पाणीसाठा असला तरी दहा ते अकरा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.  ‘उजनी’त मुबलक पाणी असल्याने उन्हाळ्यात शहराला पाणी कमी पडणार नाही, असे नगर परिषद पाणीपुरवठा अभियंता स्वप्नील ओव्हाळ यांनी सांगितले.

13 दिवसांआड परभणीकरांना पाणी 
परभणी : महापालिकेचे पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. भर उन्हाळ्यात परभणीकरांना १३ दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. वसमत रस्त्यावरील राहाटी येथील बंधाऱ्यातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहरासाठी सिद्धेश्वर प्रकल्पात पाणी आरक्षित करण्यात आले आहे. १.५ दलघमी क्षमता असलेल्या राहाटी बंधाऱ्यात सिद्धेश्वर धरणाचे पाणी घेऊन ते परभणी शहरवासीयांना दिले जाते. आतापर्यंत तीन वेळ सिद्धेश्वर प्रकल्पातून पाणी घेण्यात आले आहे. सध्याही बंधाऱ्यात पाणी उपलब्ध आहे. मात्र, मनपाची ही नळ योजना ३० वर्षांपूर्वीची जुनी आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा होत नाही. शहरातील जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. परिणामी १३ दिवसांतून एक वेळा शहरवासीयांना पाणी मिळत आहे़ नागरिकांकडे १३ दिवसांपर्यंत पाणी साठवणूक करणारी साधने उपलब्ध नसल्याने टंचाईला तोंड द्यावे लागत आहे़ शहरासाठी युआयडीएसएसएमटी ही पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे़ त्यामुळे सध्या तरी शहरवासीयांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे़ 

03 दिवसांआड मिळते हिंगोलीकरांना पाणी
हिंगोली : शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. सिद्धेश्वर धरण सध्या मृतसाठ्यात गेले असले तरीही हिंगोलीला पुरेल इतके पाणी आहे. हिंगोलीला आठ ते दहा वर्षांपासून नवीन जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होत आहे. तरीही शहरातील विविध भागांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. सिद्धेश्वर धरण मृतसाठ्यात गेले असले तरीही दीडशे दलघमीपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.

10 दिवसांआड जालन्यात पाणी; घाणेवाडीने तळ गाठला 
जालना : शहरवासीयांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. शहराची मदार असलेल्या घाणेवाडी जलाशयाने तळ गाठला आहे. त्यामुळे आता संपूर्ण जालना शहराला जायकवाडी येथील पाणी पुरवठा योजनेवरच अवलंबून राहावे लागणार आहे. जायकवाडी जलाशयातील पाणी पातळी शून्य टक्क्यापेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे तेथून दररोज होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये कपात करण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जालना शहरात दहा दिवसांतून एकवेळेस पाणीपुरवठा होतो. तो आता साधारणपणे पंधरा दिवसांतून एकदा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. जालन्यासह जिल्ह्यात पाणी टंचाईने रौद्र रूप धारण केले असून, ३३० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, ४०० पेक्षा अधिक विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

08 दिवसांआड पाणी मिळत असल्याने लातूरकरांचे प्रचंड हाल
लातूर : मांजरा प्रकल्पात सद्य:स्थितीत २२ दशलक्ष घनमीटर पाणी साठा असून, लातूर शहरासाठी दररोज ३८ एमएलडी पाणी उचलले जात आहे.  लातुरात सध्या दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असून हे पाणी जूनअखेरपर्यंत पुरेल, असा विश्वास मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला आहे. त्याअनुषंगाने लातूर मनपाकडून पाण्याचा काटकसरीने वापर केला जात आहे. जलशुद्धीकरण केंद्रावर होणारी तूट कमी केली असून, शहरातील जलवाहिनीचे लिकेजही कमी केले आहे. शिवाय, शहरातील नागरिकांना नळाला तोट्या बसवून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मांजरा प्रकल्पावर लातूर, कळंब, अंबाजोगाई, धारूर, मुरुड आदी शहरांना पाणी पुरवठा केला जातो.

Web Title: Drought in Marathwada: Thirsty cities of Marathwada ! Massive citizens are suffers due to without water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.