Yavatmal Bus Accident: यवतमाळ जवळ भरधाव ट्रक व बसमध्ये समोरासमोर धडक; दोघांचा झाला जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:56 IST2025-12-05T13:54:59+5:302025-12-05T13:56:04+5:30
MSRTC Bus Yavatmal Accident: वणी-यवतमाळ राज्य मार्गावरील दुर्घटना : जखमी पांढरकवडा येथील रुग्णालयात भरती

A speeding truck and a bus collided head-on near Yavatmal; both died on the spot
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव / करंजी / पांढरकवडा (यवतमाळ) : भरधाव ट्रक व बसमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात दोन प्रवासी जागीच ठार झाले, तर आठजण गंभीर आणि दोघे किरकोळ जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री ८.२० वाजेच्या सुमारास वणी-यवतमाळ राज्य मार्गावरील जळका फाट्यावर घडली.
नवनाथ शिवाजी काचे (वय ३०, रा. मरस्कोल्हे (वय ५०, रा. मंगी, ता. अंकुलगा, जि. लातूर), भीमराव केळापूर) अशी मृतांची नावे आहेत. शुभम ढोंबरे, रोहित योकनकर (रा. मोहदा), सचिन झिलपे (रा. बोटोनी), अमोल टेकसे (रा. मेटीखेडा), संतोष खिलके (रा. किंगा), प्रसाद चिंचोळकर (रा. मेटीखेडा), विमल मरस्कोल्हे (रा. मंगी), दुर्गा ठाकरे रा. ब्रह्मपुरी, नरेंद्र मडावी (रा. मंगी), भीमराव मडावी (रा. मंगी) अशी गंभीर जखमींची नावे असून, त्यांना उपचारार्थ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे,इतर दोन किरकोळ जखमींना पांढरकवडा येथील रुग्णालयात भरती केले आहे.
एमएच ४० वाय ५७८२ क्रमांकाची बस वणी येथून यवतमाळला जात होती. तर एमएच २८ बीबी ५८२७ क्रमांकाचा ट्रक वणीकडे येत होता. दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक बसली. या अपघातात बस एका बाजूने पूर्णतः कापल्या गेली. अपघात घडताच चालक बेशुद्ध पडल्याने बस २०० मीटर लांब जात रस्त्याच्या खाली उतरून थांबली. यावेळी वणीचे आमदार संजय देरकर जळका येथे सार्वजनिक कार्यक्रमासाठी आले असता अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. सर्व जखमी व मृतांना गावकऱ्यांच्या सहकार्याने करंजी व पांढरकवडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. बसमध्ये १५ प्रवासी, चालक, वाहक होते. यात नवनाथ काचे, भीमराव मरस्कोल्हे हे दोन प्रवासी जागीच ठार झाले, तर इतर प्रवासी जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली असून, अधिक तपास सुरू आहे.
जेवणाचा डबा घेतल्यानंतर काही अंतरावरच अपघात
बसचे कंडक्टर सचिन दौलत झिलपे हे बोटोनी गावचे रहिवासी असून, त्यांनी घरून जेवणाचा डबा घेतल्यानंतर अवघ्या काही अंतरावरच अपघात झाला. दरम्यान, प्रल्हाद अरविंद चिंचोळकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.