विकास कामातील गैरप्रकाराची चौकशी

By Admin | Updated: May 23, 2014 00:18 IST2014-05-23T00:18:39+5:302014-05-23T00:18:39+5:30

तालुक्यात झालेल्या विविध विकास कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून कोणतेही काम इस्टिमेट प्रमाणे झाले नाही. मोजमाप पुस्तिकेतील नोंदी आणि प्रत्यक्ष काम यात प्रचंड तफावत आहे.

Unprotected inquiry into development work | विकास कामातील गैरप्रकाराची चौकशी

विकास कामातील गैरप्रकाराची चौकशी

रितेश पुरोहित - महागाव

तालुक्यात झालेल्या विविध विकास कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून कोणतेही काम इस्टिमेट प्रमाणे झाले नाही. मोजमाप पुस्तिकेतील नोंदी आणि प्रत्यक्ष काम यात प्रचंड तफावत आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत बुधवारी झालेल्या पंचायत समितीच्या आढावा बैठकीत या कामातील गैरप्रकाराची चौकशी करण्याचे ठरविण्यात आले. यासाठी पंचायत समिती सदस्यांसह अभियंत्याचे पथक तयार करण्यात आले. यामुळे बोगस काम करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. यासाठी आमदार, खासदार, जिल्हा परिषद, वित्त आयोग आदींचा कोट्यवधींचा निधी खर्च झाला. तांडा वस्ती सुधार योजना, दलित वस्ती सुधार योजना, महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजना यासह कृषी विभाग आणि सर्व शिक्षा अभियानातून शाळा व अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात आले. ठिकठिकाणी सिमेंट रस्ते, पांदन रस्तेही तयार करण्यात आले. मात्र या कामांचा गुणवत्ता ढासळली आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या. परंतु दखल घेतली नाही. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. बुधवारी महागाव पंचायत समितीची मासिक आढावा बैठक झाली. या बैठकीत हा मुद्दा चर्चेला आला. सभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या उपसभापती विजय महाजन यांनी या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यावरून आता या कामांची चौकशी केली जाणार आहे. तालुक्यात झालेल्या विकास कामांची गुणवत्ता ढासळली आहे. झालेल्या कामांपैकी ३० ते ४० टक्के कामे गायब आहे. इस्टिमेटप्रमाणे कोणतेही काम दिसत नाही. मोजमाप पुस्तिकेत असलेले काम आणि प्रत्यक्ष काम यात प्रचंड तफावत आहे. यातून लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप होत आहे. आता या प्रकरणाची चौकशी होणार असल्याने संबंधितांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Unprotected inquiry into development work