कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांंक

By Admin | Updated: May 23, 2014 00:15 IST2014-05-23T00:15:19+5:302014-05-23T00:15:19+5:30

पेरणीच्या काळात बरेचदा शेतकर्‍यांच्या माथी बोगस बियाणे मारल्या जाते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने टोल फ्री क्रमांक सुरू करण्याचा निर्णय

Toll free number of agricultural department | कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांंक

कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांंक

 यवतमाळ : पेरणीच्या काळात बरेचदा शेतकर्‍यांच्या माथी बोगस बियाणे मारल्या जाते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने टोल फ्री क्रमांक सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या कृषी समिती बैठकीत घेतला. या बैठकीत सदस्यांनी ठिबक व स्प्रिंकलर सबसिडीचा मुद्दा उपस्थित करून अधिकार्‍यांना जाब विचारला. कृषी समितीच्या बैठकीत सर्वप्रथम उपाध्यक्ष ययाती नाईक यांनी खरिपाच्या तयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यात दोन लाख २५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवश्यकता आहे. सध्या एक लाख ७० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे तर शेतकर्‍यांकडून ८१ हजार क्विंटल सोयाबीन आहे. या सोयाबीनवर बिज प्रक्रिया करून त्याचाही बियाणे म्हणून वापर करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. याशिवाय कपाशीच्या २० लाख ३५ हजार बॅग उपलब्ध आहेत. कापसाच्या बियाण्याचा पुरवठा मागणीपेक्षाही अधिक असल्याचे कृषी विकास अधिकारी जगन राठोड यांनी बैठकीत सांगितले. मान्सूनपूर्व लागवडीसाठी सिंचन विभागाकडून सहा हजार ३०० हेक्टरवर पाणी पुरविण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात आले. प्रकल्पांमध्ये ३३ टक्के पाणीसाठा आहे. त्याचा सिंचनासाठी उपयोग करता येऊ शकतो. जिल्हा बँकेने १७७ कोटीच्या पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवले असून ११७ कोटींचे वाटप केल्याचे बँकेच्या प्रतिनिधीने सांगितले. सोयाबीनच्या बियाण्याची महाबीजकडे अधिक मागणी करण्याचे निर्देश ययाती नाईक यांनी दिले. या बैठकीमध्ये परशराम पारध यांनी अल्पभूधारक शेतकर्‍यांना स्प्रिंकलर व ठिबकसाठी दिल्या जाणार्‍या सबसिडीचा मुद्दा उपस्थित केला. ७० टक्के सबसिडी असतानाही शेतकर्‍यांकडून संचाची अर्धी रक्कम वसूल केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या मुद्यावर कृषी अधीक्षक कार्यालयातील प्रतिनिधीने योग्य उत्तर दिले नाही. तसेच आत्मा योजना, पाणलोट कार्यक्रमाचीही माहिती दिली नाही. त्यामुळे सदस्य चांगलेच संतप्त झाले होते. पेरणीच्या काळात बियाण्याचा काळाबाजार थांबविण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने १७ भरारी पथक स्थापन केले आहे. सोयाबीनच्या बियाण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. निर्धारित दरापेक्षा अधिक दराने बियाणे विक्री करणार्‍यांची थेट तक्रार करावी, यासाठी जिल्हास्तरावर ०७२३२-२४१४६९ हा टोल फ्री क्रमांकही सुरू करण्यात आला आहे. शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी करताना अधिकृत परवानाधारकांकडूनच खरेदी करावे. शिवाय बियाण्याची पावतीही घ्यावी, अशी सूचनाही देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या कृषी रत्न, कृषी भूषण, शेतीनिष्ठ, जिजामाता शेतीनिष्ठ या पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही तालुका कृषी अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. या बैठकीला वसंतराव चंद्रे, परशराम पारध, अरूण कळंबे, दिपाली जाधव, आशा शिंगनकर, सुनीता टेकाम, प्रतीभा आसुटकर, सुनीता किन्हेकार आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Toll free number of agricultural department