जीवन प्राधिकरणामुळे उडाली झोप

By Admin | Updated: September 1, 2014 23:55 IST2014-09-01T23:55:55+5:302014-09-01T23:55:55+5:30

जीवन प्राधिकरणच्या नळ सोडण्याची कुठलेही नियोजन नसल्याचे दिसून येते. वारंवार तक्रारी करूनही येथील अभियंते व कर्मचारी दाद देत नाही. जीवन प्राधिकरणच्या कारभाराने नागरिकांची झोप उडविली आहे.

Sleep caused due to life authority | जीवन प्राधिकरणामुळे उडाली झोप

जीवन प्राधिकरणामुळे उडाली झोप

यवतमाळ : जीवन प्राधिकरणच्या नळ सोडण्याची कुठलेही नियोजन नसल्याचे दिसून येते. वारंवार तक्रारी करूनही येथील अभियंते व कर्मचारी दाद देत नाही. जीवन प्राधिकरणच्या कारभाराने नागरिकांची झोप उडविली आहे. मध्यरात्री नळ येत असल्याने संपूर्ण रात्रच पाण्यासाठी जागून काढावी लागत आहे. दिवसा नळ सोडण्याबाबत वारंवार तक्रारी करूनही जीवन प्राधिकरणने आपल्या वेळेत बदल केला नाही.
शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे आहे. या कार्यालयात कुणाचाच पायपोस कुणाला नसल्याने नागरिकांचे मात्र हाल होत आहे. पाणी सोडण्याच्या वेळेचे नियोजन नसल्याने राजेंद्रनगर, गांधीनगर, नेहरूनगर, वंजारीफैल यासह इतरही भागातील नागरिकांची झोप उडाली आहे. या भागात मध्यरात्री नळ येतात. पाण्यासाठी नागरिकांना दिवसभर काम करूनही रात्र जागावी लागते. नळ आल्यानंतर मध्यरात्रीच पाणी भरावे लागते. विशेष म्हणजे दिवस उजाडताच या भागातील नळ बंद होतात. चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नेमक्या कोणत्या रात्री नळ येणार हेही निश्चित नसते. प्रत्येक वेळा नळ आले का, हे तपासून पहावे लागते. आता तर नागरिकांनी नळ पाण्यासाठी परिसरातच पाळी ठरवून दिली आहे. नळ आल्याची माहिती फोनद्वारे आपल्या शेजाऱ्या, पाजाऱ्यांना दिली जाते. तेव्हाच पाणी भरण्याशिवाय पर्याय उरत नाही. जीवन प्राधिकरणाच्या शाखा अभियंत्याकडे या बाबत तक्रारी घेऊन गेलेल्या नागरिकांना तो भाग माझ्याकडे येत नाही, असे सांगून टोलवाटोलवी केली जाते. आता भर पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी रात्र जागविण्याची वेळ शहरातील नागरिकांवर आली आहे. जीवन प्रधिकरणने नळाच्या वेळेत बदल करावा, दिवसा कोणत्याही वेळेस नळ आले तर पाणी भरणे सहज शक्य आहे. मात्र याला प्रतिसाद न मिळाल्यास नागरिकांकडून उग्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Sleep caused due to life authority