राजस्थानचे बियाणे महाराष्ट्रात यशस्वी ! विशिष्ट सोयाबीन खरेदीसाठी बियाणे कंपन्यांमध्ये स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 13:32 IST2025-11-12T13:32:05+5:302025-11-12T13:32:53+5:30
Yavatmal : खुल्या बाजारात सध्या नियमित सोयाबीनला ३,८०० ते ४,६०० रुपये क्विंटल दर मिळत असताना, एका विशिष्ट जातीच्या सोयाबीनला तब्बल ५,५०० ते ७,५०० रुपये क्विंटल इतका उच्च दर मिळत आहे.

Rajasthan seeds successful in Maharashtra! Competition among seed companies for purchasing specific soybeans
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खुल्या बाजारात सध्या नियमित सोयाबीनला ३,८०० ते ४,६०० रुपये क्विंटल दर मिळत असताना, एका विशिष्ट जातीच्या सोयाबीनला तब्बल ५,५०० ते ७,५०० रुपये क्विंटल इतका उच्च दर मिळत आहे. विशेष म्हणजे, या विशिष्ट सोयाबीनचे वाण राजस्थानातून महाराष्ट्रात आले आहे. या सोयाबीनची मागणी दिवसेंदिवस वाढत असून, बियाणे कंपन्यांमध्ये ते खरेदी करण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. परिणामी, विदर्भातील अनेक शेतकरी कारंजा आणि वाशिम बाजारपेठेकडे वळत असून, जिल्ह्यातील शेतकरीही मोठ्या संख्येने या बाजारात दाखल होत आहेत.
गत तीन ते चार वर्षापासून राजस्थानातील एका विशिष्ट जातीच्या बियाणाचा प्रयोग शेतकरी करीत आहेत. पांढऱ्या फुलाचे आणि बरबटीच्या आकाराच्या सोयाबीनवर काळी रेषा आहे. यामुळे हे सोयाबीन प्रचलित सोयाबीनच्या तुलनेत लवकर ओळखता येते. याचा उत्पादन कालावधी इतर सोयाबीनसारखाच आहे. मात्र, हे बियाणे कुठल्याही प्रकारच्या व्हायरसला बळी पडत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांकडून अशा सोयाबीनची लागवड वाढत आहे. भविष्यातील हा कल पाहता बियाणे कंपन्या अलर्ट झाल्या आहेत. त्यांनी शेतकऱ्यांकडून हे विशिष्ट सोयाबीन बियाणे घेण्यास सुरुवात केली आहे. यातूनच कारंजा आणि वाशिम बाजारपेठेत विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी चांगला दर मिळावा म्हणून गर्दी केली आहे. ही गर्दी या दोन्ही बाजारपेठेत आवाक्याबाहेर गेली आहे.
शेतकरीच कृषी शास्त्रज्ञांच्या वाटेवर
बदलत्या हवामानामुळे कृषी क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. अशा स्थितीत बदलत्या वातावरणात टिकणारे बियाणे बाजारात येणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रचलित बियाणांवर संशोधन आवश्यक आहे. याची जबाबदारी कृषी शास्त्रज्ञांकडे आहे. मात्र, शेतकरी देखील आपल्या स्तरावर प्रयोग करत आहेत. यातून राजस्थानची व्हरायटी महाराष्ट्रात यशस्वी झाली. त्यातून बाजारात मोठी उलथापालथ होताना पाहायला मिळत आहे.
अनेक कंपन्यांकडे मोजकेच बियाणे
अति पावसाने राज्यात सोयाबीनचे सीड प्लॉट उद्ध्वस्त झाले. पुढील वर्षी सोयाबीन लागवड करण्यासाठी अनेक कंपन्यांकडे बियाणे मोजकेच आहेत. अशा स्थितीत बियाणे कंपन्या बाजारातून सोयाबीन खरेदी करीत आहेत. त्यांच्या उगवण क्षमतेची तपासणी केल्यावर हे सोयाबीन बियाणे कंपन्या विक्रीला आणण्याची शक्यता वर्तविली जात आहे.