कौटुंबिक वादातून व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला अश्लील व्हिडीओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 16:15 IST2021-10-29T16:13:04+5:302021-10-29T16:15:49+5:30
कौटुंबिक सलोख्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर झालेल्या वादातून या अश्लील व्हिडीओ व मेसेज शेअर करण्याचा प्रकार यवतमाळात घडला आहे.

कौटुंबिक वादातून व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला अश्लील व्हिडीओ
यवतमाळ : नातेवाइकांच्या सतत संपर्कात राहता यावे, एकमेकांची ख्यालीखुशाली विचारता यावी, या उद्देशाने व्हॉटस्ॲप ग्रुप तयार केले जातात. या ग्रुपचा विधायक कामासाठी उपयोग होऊ शकतो. आज सर्वांचेच असे कौटुंबिक ग्रुप आहेत. कौटुंबिक वादातून या ग्रुपवर अश्लील व्हिडीओ व मेसेज शेअर करण्याचा प्रकार यवतमाळात घडला. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी पती-पत्नीसह मुलीविरोधातही गुन्हा दाखल केला.
यवतमाळ शहरातील अवधूतवाडी परिसरात राहणाऱ्या प्रतिष्ठित कुटुंबाचा व्हॉटस्ॲप ग्रुप होता. यात लहान मुला-मुलींसह महिला व पुरुषांचा समावेश होता. ११ स्त्री व आठ पुरुष सदस्य असलेला हा व्हॉटस्ॲप ग्रुप कौटुंबिक चर्चेसाठी तयार करण्यात आला होता. हैदराबाद-वर्धा एनसीसी आणि सिबलिंग या नावाने हे दोन ग्रुप तयार करण्यात आले होते.
४ जुलै २०१३ रोजी तयार झालेल्या या कौटुंबिक ग्रुपमध्ये कौटुंबिक विषयावरच चर्चा केली जात होती. मात्र, अचानक काही कारणांवरून त्या ग्रुपमधील सदस्यांत वाद झाले. या वादाचा वचपा काढण्यासाठी १७ जुलै २०२१ रोजी रात्री ११ वाजता दरम्यान दोन्ही ग्रुपवर अश्लील व्हिडीओ व मेसेज सातत्याने सेंड करण्यात आले. यामुळे ग्रुपमध्ये असलेल्या महिला, मुली यांचा एक प्रकारे विनयभंगच झाला.
या प्रकरणी गुरुवारी २८ ऑक्टोबर रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दिली. त्या तक्रारीवरून मुकुंद माहेश्वरी रा. बेगम पेठ हैदराबाद तेलंगणा यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अधिक तपास अवधूतवाडी पोलीस करीत आहे.