औटघटकेचे का होईना, दिवास्वप्न पूर्ण

By Admin | Updated: September 21, 2014 00:03 IST2014-09-21T00:03:02+5:302014-09-21T00:03:02+5:30

डोक्यावर पी कॅप अन् हातात केन, असा वर्दीचा रुबाब. खरे तर पोलीस खात्यात दाखल झाल्यापासूनच आपणही फौजदार व्हावे, असे प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वप्न असते. मात्र सेवानिवृत्ती उंबरठ्यावर येवूनही

The Light of the Light, the daydream is complete | औटघटकेचे का होईना, दिवास्वप्न पूर्ण

औटघटकेचे का होईना, दिवास्वप्न पूर्ण

यवतमाळ : डोक्यावर पी कॅप अन् हातात केन, असा वर्दीचा रुबाब. खरे तर पोलीस खात्यात दाखल झाल्यापासूनच आपणही फौजदार व्हावे, असे प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वप्न असते. मात्र सेवानिवृत्ती उंबरठ्यावर येवूनही हे स्वप्न पूर्ण होत नाही. त्यासाठी अनुभव आणि सेवाज्येष्ठतेचा उपयोग होत नसल्याचे पाहून फौजदार होणे हे या कर्मचाऱ्यांसाठी तर दिवास्वप्नच. मात्र ते प्रत्यक्षात उतरले. विधासभा निवडणुकीने औटघटकेचे का होईना, जिल्हा पोलीस दलातील तब्बल ४० जणांना तात्पुरती फौजदार म्हणून नियुक्ती मिळाली.
राज्याच्या पोलीस खात्यात फौजदारांची शेकडो पदे रिक्त आहेत. स्पर्धा परीक्षा व खात्यांतर्गत परीक्षा घेवूनही ही पदे रिक्तच राहिली. विधानसभा निवडणूक बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर ही पदे रिक्त ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे गृह विभागाने त्यावर तोडगा काढत सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना निवडणूक काळापुरती म्हणजेच तात्पुरती फौजदारकी बहाल करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयाच्या आस्थापना विभागाने अर्ज मागविले होते. जिल्हा पोलीस दलात कार्यरत तब्बल १२२ सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी तात्पुरते फौजदार म्हणून नियुक्ती मिळावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्याकडे अर्ज केले. हे अर्ज अमरावती परीक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आले. पोलीस महानिरीक्षक बिपिन बिहारी यांनी त्यातील ४० जणांना तात्पुरते फौजदार म्हणून नियुक्ती देण्याचे आदेश काढले. हे आदेश शनिवारी सकाळी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाले. त्यामध्ये सध्या मिळत असलेले वेतन आणि भत्ते यावरच तात्पुरते फौजदार म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. तसेच भविष्यात शासनाने निर्णय घेतल्यास कायमस्वरूपी फौजदारी दिली जावू शकते असेही नमूद आहे. आदेशात आपले नाव असल्याचे पाहून अनेकांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. औट घटकेचे का होईना, फौजदार होण्याचे दिवास्वप्न पुरे झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते.
(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The Light of the Light, the daydream is complete