सोयाबीनवर मोझॅकचा प्रादुर्भाव

By Admin | Updated: September 27, 2014 23:22 IST2014-09-27T23:22:41+5:302014-09-27T23:22:41+5:30

मुळावा, पोफाळी परिसरात सोयाबीन पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. गेल्या २० पेक्षा अधिक वर्षांपासून या परिसरात सोयाबीनची लागवड केली जाते.

Influence of mosaic on soybeans | सोयाबीनवर मोझॅकचा प्रादुर्भाव

सोयाबीनवर मोझॅकचा प्रादुर्भाव

शेतकरी धास्तावले : २० वर्षांत पहिल्यांदाच लागण
मुळावा : मुळावा, पोफाळी परिसरात सोयाबीन पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
गेल्या २० पेक्षा अधिक वर्षांपासून या परिसरात सोयाबीनची लागवड केली जाते. कमीअधिक पावसात हमखास फायदा मिळवून देणारे पीक म्हणून सोयाबीनची निवड केली जाते. या पिकाने अनेकांचे जीवनमान उंचावल्यामुळे अनेक कापूस उत्पादक शेतकरी कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या सोयाबीनकडे वळले आहे. यावर्षी आधीच निसर्गाचा लहरीपणा आणि आता सोयाबीनवर मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे हातचे पीक जाण्याची भीती व्यक्त होत आहे. तरोडा येथील पंजाबराव चव्हाण यांचे पाच एकर सोयाबीन या रोगाच्या सावटात आले आहे. तसेच जयवंत चव्हाण, प्रशांत चव्हाण, डॉ. विठ्ठल चव्हाण, तिवरंग येथील गणेश कदम, राहुल चौतमाल, पार्डी येथील रूस्तम चव्हाण, नानाराव चव्हाण, राजेश खंडारे, किसन चव्हाण या सर्व दोन ते दहा एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर या आजाराची लागण झाल्याचे दिसून येत आहे. यावर कृषी विभागाच्या मार्गदर्शनात विविध प्रकारचे कीटकनाशके व बुरशीनाशक फवारणी केल्यानंतरही या आजाराच्या कीडींवर नियंत्रण मिळविणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. तरोडा येथे कृषी सहायक डी.एस. केकान यांनी भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा ७५ टक्के सोयाबीनचे क्षेत्र या परिसरातील या आजाराने बाधित झाल्याची माहिती त्यांनी दिली. २० ते २५ वर्षांत प्रथमच अशा प्रकारच्या रोगामुळे शेतकरी गोंधळून गेले आहे. जिल्हा कृषी विभागाने याची गांभीर्याने दखल घेवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Influence of mosaic on soybeans