घरकूल अडकले बांधकाम निधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:00 AM2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:01:15+5:30

घर नसलेल्या व्यक्तींचा आकडा साडेतीन लाखांच्या घरात आहे. आता या प्रपत्राला आधारकार्डशी जोडले जात आहे. यामुळे कुठल्या व्यक्तीला याआधी घरकूल मिळाले आहे काय, याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. गाव पातळीवर या संपूर्ण प्रक्रियेला युध्दपातळीवर राबविले जात आहे.

Gharkul stuck in construction fund | घरकूल अडकले बांधकाम निधीत

घरकूल अडकले बांधकाम निधीत

googlenewsNext
ठळक मुद्देतूर्त आधार नोंदणी : साडेतीन लाख लाभार्थी

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने घरकूल बांधले जाते. हा निधी तूर्त थांबला आहे. नवीन वर्षाचे उद्दिष्टही घोषित झाले नाही. यामुळे साडेतीन लाख घरकूल निधीच्या प्रतीक्षेत आहे. तत्पूर्वी आधार नोंदणी प्रक्रिया राबविली जात आहे. यानंतर ग्रामसभेतून पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. घरकुलाचे पुढील दहा वर्षाचे नियोजन यातूनच होणार आहे.
आपलेही सुंदर घरकूल असावे, असे प्रत्येकांना वाटते. त्याकरिता अहोरात्र मेहनत घेतो. यावर्षी या घरकुलांना कोरोनाची दृष्ट लागली. जुने घर झाले नाही. नव्या घराचा पत्ता नाही. अशी संपूर्ण अवस्था सध्या सर्वत्र आहे.
या सोबत एक चांगली गोष्ट या कालखंडात संपूर्ण राज्यात घडत आहे. घरकूल नसलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंदणी प्रपत्र ‘ड’ मध्ये ग्रामपंचायतीने केली आहे. घर नसलेल्या व्यक्तींचा आकडा साडेतीन लाखांच्या घरात आहे. आता या प्रपत्राला आधारकार्डशी जोडले जात आहे. यामुळे कुठल्या व्यक्तीला याआधी घरकूल मिळाले आहे काय, याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. गाव पातळीवर या संपूर्ण प्रक्रियेला युध्दपातळीवर राबविले जात आहे.
यानंतर प्रपत्र ‘ब’ भरले जाणार आहे. त्याकरिता ग्रामसभा घेतली जाणार आहे. या ग्रामसभेत अर्जदाराचे नावे वाचून दाखविले जाणार आहे. यात कोण पात्र कोण अपात्र, कोणाला घराची सर्वाधिक आवश्यकता आहे, या बाबी नोंदविल्या जाणार आहे. यानंतर घरकुलासाठी प्रपत्र ‘ब’ बनविले जाणार आहे.
घरकुलासाठी क्रमवारी निश्चित केली जाणार आह. या यादीत असलेली नावे आणि गावाला मंजूर झालेली घरकुले याचा विचार होणार आहे. यातून क्रमांकानुसार लाभार्थ्यांना घरकूल दिले जाणार आहे.

ग्रामपंचायतीत नि:शुल्क आधार नोंदणी
घरकुलाच्या प्रपत्र ‘ड’ करीता आधार नोंदणी म्हणजे घरकूल मिळणे नव्हे, तर ती अर्जाची परिपूर्ण प्रक्रिया आहे. ग्रामपंचायत अथवा गटविकास अधिकारी कार्यालयात विनाशुल्क आधार नोंदणी करण्याच्या सूचना आहे. मात्र गाव पातळीवर लाभार्थ्यांकडून काही केंद्र चालक पैसे घेत असल्याची ओरड आहे.

कर वसूलीसाठी हातभार
ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा मूळ स्रोत घरपट्टी आणि पाणी कर आहे. गावात केवळ २० ते ३० टक्के नागरिकांनीच हा कर भरला आहे. आता आधार नोंदणी करताना ग्रामपंचायतीने नवा फंडा आणला आहे. कराचा भरणा केल्याशिवाय आधार जोडला जाणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या वसूलीसाठी हातभार लागला आहे.

आधारकार्ड जोडणे म्हणजे घरकूल मिळाले असे समजू नये. ही एक प्रक्रिया आहे. यानंतर ग्रामसभेत घरकूल लाभार्थ्यांची नावे निश्चित होतील.
- राजेश कुलकर्णी
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: Gharkul stuck in construction fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.