इन्स्टाग्रामवरची मैत्री; मुंबई, गुजरात, आसामवरून तिघी आल्या यवतमाळात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 15:17 IST2025-12-29T15:16:34+5:302025-12-29T15:17:22+5:30
महिन्याभरातील चार घटना : पोलिसांनी समुपदेशन करत मुलींना केले कुटुंबीयांच्या स्वाधीन...

इन्स्टाग्रामवरची मैत्री; मुंबई, गुजरात, आसामवरून तिघी आल्या यवतमाळात
यवतमाळ : सोशल मीडियावरून संवाद साधणे व जवळीक निर्माण होण्यास फार वेळ लागत नाही. त्यातही अल्पवयीन मुले-मुली लवकरच याला बळी पडतात. इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. नंतर प्रेम जडले या प्रेमाच्या शोधात तीन अल्पवयीन मुली थेट प्रियकराच्या घरी पोहोचल्या. यामुळे जाळ्यात ओढणारे प्रियकर व त्यांचे कुटुंब हादरून गेले. यवतमाळ शहरात एकाच महिन्यात परराज्यातून प्रेमाच्या शोधात येणाऱ्या तीन अल्पवयीनांना संरक्षणात त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले.
प्रेमात बुडालेल्या अल्पवयीन मुलींनी कुठलाही विचार न करता एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे आपल्या प्रियकराचा शोध सुरू केला.
नागपूरच्या मुलीसोबत घडला किळसवाणा प्रकार
नागपूर शहरातून अल्पवयीन मुलगी यवतमाळात आली होती. तिच्यावर दोन ठिकाणी सलग दोन दिवस सामूहिक अत्याचार करण्यात आलेे होते. पालकांच्या तक्रारीवरून नागपूर पोलिसांनी यवतमाळात शोध घेतला.
यवतमाळात सापडलेल्या त्या मुलीला गुंगीचे औषध देण्यात आले होते. त्यानंतर अत्याचार करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच डिसेंंबर महिन्यात आलेल्या तीन अल्पवयीन मुलींना सुखरुप सोडण्यात आले.
अल्पवयीन मुलीला बालसमितीने घरी पाठवले
आसाम येथून एक मुलगी यवतमाळ शोधत प्रियकराच्या घरी पोहोचली. त्या मुलीला पाहून प्रियकराच्या कुटुंबीयाला धक्का बसला. प्रकरण पोलिसांकडे गेले. नंतर बालकल्याण समितीपुढे त्या अल्पवयीन मुलीला सादर करण्यात आले. तेथे तिचे समुपदेशन करून मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. नंतर पोलिस संरक्षणात तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्या गेले.
वयात येणाऱ्या मुला-मुलींवर पालकांनी ठेवावा ‘वाॅच’
गुजरात राज्यातील अल्पवयीन मुलगी इन्स्टाग्रामवरील प्रेमातून यवतमाळात आली. या प्रकरणातही संपूर्ण प्रक्रिया करून मुलीला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी मुंबई दादर येथील मुलगी यवतमाळात प्रियकराला शोधत पोहोचली होती. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत तीन मुली प्रियकराच्या शोधात आल्या आहेत.
वयात येत असलेल्या मुुला-मुलींचे मित्र-मैत्रिणी कोण याचीही माहिती ठेवणे आवश्यक आहे. तरच असे प्रकार टाळता येईल, असे बालकल्याण समिती सदस्य अनिल गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.