वृक्ष जगविण्यासाठी वापरले पिण्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:01:08+5:30

मालखेड वनपरिक्षेत्रात वनीकरण २०१९ मध्ये वृक्षलागवड करण्यात आली आहे. या वृक्षाला पाणी देण्यासाठी वनरक्षक अनंत कोरडे व ठेकेदार अरुण गेडाम यांनी संगनमत करून सोनवाढोणाला जाणारी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फोडली. एअरवॉल तोडून त्यावरून पाणी घेणे सुरू केले.

Drinking water used to keep the tree alive | वृक्ष जगविण्यासाठी वापरले पिण्याचे पाणी

वृक्ष जगविण्यासाठी वापरले पिण्याचे पाणी

Next
ठळक मुद्देसोनवाढोणात टंचाई : वन विभागाने फोडली पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : तालुक्यातील सोनवाढोणा येथे दहा किलोमीटर अंतरावरच्या येलगुंडा येथून पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन आहे. गेल्या काही दिवसांपासून गावात पाणीच येत नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाली. ग्रामपंचायतीने जुनी पाईपलाईन कुचकामी झाल्याने नवी टाकण्यासाठी ७० लाखांच्या निविदा बोलाविल्या. प्रत्यक्ष पाणीटंचाईच्या कारणाचा शोध घेतला असता वनविभागाकडून पाईपलाईन फोडून पाण्याचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघड झाला.
मालखेड वनपरिक्षेत्रात वनीकरण २०१९ मध्ये वृक्षलागवड करण्यात आली आहे. या वृक्षाला पाणी देण्यासाठी वनरक्षक अनंत कोरडे व ठेकेदार अरुण गेडाम यांनी संगनमत करून सोनवाढोणाला जाणारी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फोडली. एअरवॉल तोडून त्यावरून पाणी घेणे सुरू केले. या गंभीर प्रकारामुळे सोनवाढोणा येथे गेल्या काही महिन्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. ग्रामपंचायतीनेही काही तपासणी न करता नवीन पाईपलाईनसाठी प्रस्ताव तयार केला. ७१ लाख रुपयांच्या नवीन पाईपलाईनची निविदा काढण्यात आली. वनविभागाच्या या प्रकारामुळे ग्रामस्थांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. वनविभागात काही अधिकारीच दुसऱ्यांच्या नावाने ठेकेदारी करतात. हाच प्रकार मालखेड वनपरिक्षेत्रात जोरात सुरू आहे. त्यातूनच निर्ढावलेल्या अधिकारी, कंत्राटदाराने चक्क गावाला पाणीपुरवठा होणारी पाईपलाईन फोडून पाण्याचा वापर सुरू केला. आता संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शिवाय वृक्षांना पाणी देण्याच्या नावावर वनविभागाकडून काढलेली देयकाची रक्कमही संबंधितांकडून वसूल व्हावी, अशी मागणी होत आहे. पाणी वापराचा गैरप्रकार उघड होण्यास करण्यास झालेल्या विलंबाबद्दलही नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

वनविभागाच्या कारवाईकडे लक्ष
सर्वसामान्य व्यक्तीने पाण्यासाठी एखादा वॉल तोडला तर त्याला गंभीर स्वरूपाच्या कारवाईला सामोरे जावे लागते. येथे तर वनविभागातील वनरक्षक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीनेच कायदा हातात घेतला आहे. त्यातही वनविभाग व जिल्हा परिषद प्रशासन या दोघांचेही मोठे नुकसान केले आहे. वनविभागाची फसवणूक करत वृक्ष लागवड केलेल्या भागाला पाणी दिले आहे. वनरक्षक व कंत्राटदारावर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करून त्याची नुकसान भरपाई वसूल केली जावी, अशी मागणी होत आहे.


वॉल लिकेज असल्याने पाणी घेतले आहे. मात्र पाईपलाईन फोडून पाणी घेतले असल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल.
- विनोद कोव्हळे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, नेर

सदर गैरप्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पाहणी करण्यात आली. याविषयी गटविकास अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार केली जाईल. पाणी वापराचा प्रकार किती दिवसांपासून सुरू आहे, याची माहिती जाणून घेतली जात आहे.
- मिलिंद भगत,
सरपंच, सोनवाढोणा, ता.नेर

 

Web Title: Drinking water used to keep the tree alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी