तुम्हीही धान्यात कीडनाशक गोळ्या ठेवता का? धान्य टिकवण्याच्या नादात जीव टाकताय धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 20:13 IST2025-10-07T20:11:53+5:302025-10-07T20:13:15+5:30
Yavatmal : धान्यात रसायनांचा असुरक्षित वापर, निष्काळजीपणाचा धोकादायक

Do you also put pesticide tablets in your grain? You are risking your life in the name of preserving the grain.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : धान्यात वापरल्या जाणाऱ्या कीडनाशक पावडरच्या रासायनिक प्रक्रियेतून गॅस तयार होऊन विषबाधा झाल्याने दोन लहान मुलांचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना अहिल्यानगर येथे घडली. गहू, तांदूळ, कडधान्य वर्षभर टिकवण्यासाठी बोरिक पावडर आणि सेल्फॉससारख्या गोळ्यांचा वापर ग्रामीण भागात होतो. मात्र, या रसायनांचा असुरक्षित वापर निष्काळजीपणाचा कळस गाठतो आणि कळत-नकळतपणे मानवी जीवनासाठी मोठा धोका निर्माण करतो. ही रसायने जीवघेणी असल्याने त्यांच्या वापराबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि त्यावर नैसर्गिक उपाय करणे गरजेचे आहे.
या कीडनाशकांचा सर्रास होतो वापर
धान्य टिकविण्यासाठी महिला वर्ग बोरिक पावडर, पांढरी पावडर, बोरिक अॅसिड आदी रसायनांचा वापर करतात. धान्यामध्ये विषारी अंश राहणे, ईडीसीटी मिश्र, इंजेक्शन/धुरी, इथेलिन डायक्लोराइड आणि कार्बन टेट्राक्लोराइड, धुरी पद्धत, गॅसमुळे श्वसनमार्गाला धोका होतो.
सेल्फॉसमध्ये जहाल विषारी तत्त्वे
सेल्फॉस हे एक व्यावसायिक धुरीकरण कीडनाशक असून ते प्रथमोपचार न मिळणाऱ्या परिस्थितीत त्वरित जीवघेणे ठरू शकते.
कीडनाशक टाकताना काय काळजी घ्याल?
- पर्यायी उपाय : शक्य असल्यास रासायनिक कीडनाशके वापरणे टाळा आणि नैसर्गिक उपायांचा वापर करा.
- मात्रा : कीडनाशकाची मात्रा कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच वापरा. जास्त वापर म्हणजे जास्त धोका.
- हवाबंद : गोळ्या वापरल्यास धान्य किंवा साठवणुकीची जागा पूर्णपणे हवाबंद आणि लहान मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवा.
- हात धुवा : कीडनाशके हाताळताना ग्लोव्जचा वापर करा आणि नंतर हात साबणाने स्वच्छ धुवा.
धान्य टिकवण्याच्या नादात जीव धोक्यात
- घरात साठवलेले धान्य किडीपासून वाचविण्यासाठी नागरिक अनेकदा असुरक्षित मार्ग निवडतात.
- रासायनिक कीडनाशके जसे की बोरिक पावडर किंवा सेल्फॉस गोळ्या वापरताना त्यातील धोक्यांची पूर्ण माहिती नसते.
- यातील विषारी घटक धान्यामध्ये राहू शकतात किंवा त्यांची रासायनिक प्रक्रिया होऊन धोका होऊ शकतो.
रासायनिक प्रक्रियेमुळे विषबाधेचा धोका
सेल्फॉस (अॅल्युमिनियम फॉस्फाइड) हे रसायन हवेतील किंवा धान्याच्या ओलाव्यामुळे एचटूओच्या संपर्कात येते, तेव्हा त्याची रासायनिक क्रिया होऊन फॉस्फाइन नावाचा अत्यंत जहाल विषारी वायू तयार होतो. हा वायू श्वसनावाटे शरीरात गेल्यास थेट फुफ्फुसे, हृदय आणि मेंदूवर हल्ला करतो, ज्यामुळे अवयव निकामी होऊन मृत्यू होतो.