राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ शहर व परिसरात प्रतिष्ठित अवैध सावकारांचा धुमाकूळ सुरू असतानाचा आता बिसी (ब्रदर्ली कॉन्ट्रीब्युशन) व्यवसायातील उलाढालही पुढे आली आहे. बिसीच्या आडोशाने दरमाह कोट्यवधी रुपयांची सावकारी सुरू आहे. जाजू चौक परिसरातून आॅर्गनाईज होणाऱ्या या बिसीतूनच कोट्यवधींचे फायनान्स राजरोसपणे केले जात आहे.पाठोपाठ झालेले तीन खून आणि दोन प्रतिष्ठित व्यापाºयांच्या आत्महत्येने यवतमाळातील अवैध सावकारी व्यवसाय ऐरणीवर आला आहे. या अवैध सावकारीची पाळेमुळे खोलवर रुजली आहे. या सावकारांची भलीमोठी साखळी आहे. दोन टक्क्यापासून सुरू होणारा हा व्यवसाय पुढे ३० ते ४० टक्क्यापर्यंत जातो. प्रत्येक सावकार पुढच्याला किमान एक ते दोन टक्क्याची आपली ‘मार्जीन’ ठेऊन व्याजाने पैसा देतो. त्या मोबदल्यात स्थावर मालमत्ता लिहून घेतली जाते. अशा पद्धतीने यवतमाळात शेकडो मालमत्ता अर्ध्या किंमतीत पचविल्या गेल्या आहेत. आता तर बिसीच्या आडोश्याने चालणारी सावकारीही उघड झाली आहे.जाजू चौक परिसरातील त्या एजंसीकडूनच यवतमाळातील सर्वात मोठा बिसी व्यवसाय आॅर्गनाईज केला जातो. या एकाच एजंसीतील बिसीची मासिक उलाढाल पावणे तीन कोटी रुपयांची असल्याची माहिती आहे. या आॅर्गनायझरकडे प्रतिष्ठीत व्यापाऱ्यांचे बिसीचे आठ ते दहा ग्रुप आहेत. प्रत्येक दोन दिवसाआड बिसी उघडली जाते. एजंसीतूनच या बिसीचे नियंत्रण होते. एका ग्रुपमध्ये ४० ते ४५ सदस्य आहेत. त्यात विविध व्यवसायातील प्रतिष्ठीतांचा समावेश आहे. त्यातही बहुतांश व्यापारीच असल्याचे समजते. प्रत्येकी दोन लाखांपासून ही बिसी सुरू होते. त्याची बोली लावली जाते. या महिन्यात बोली लागल्यानंतर दुसऱ्या महिन्यात बोली न लावता आॅर्गनायझर बिसी ठेवतो. हा पैसा तो सावकारीत दोन ते तीन टक्क्याने वाटतो. या साखळीतील आठ ते दहा गटात पुढे हा पैसा वाटतात. अशा पद्धतीने बिसी आॅर्गनाईज करणारे अनेक प्रतिष्ठीत शहरात असले तरी जाजू चौकातील आॅर्गनायझर सर्वात मोठा असल्याचे सांगितले जाते. बिसी व त्या माध्यमातून चालणाऱ्या अवैध सावकारीचा सर्वात मोठा फायनान्सर जाजू चौक परिसरात आहे.बिसीतील दरमाह जमा होणारा पैसा अवैध सावकारीच्या व्यवसायात फायनान्स करून त्यातून अनेक स्थावर मालमत्ता अर्ध्या किंमतीत हडपल्याची शेकडो उदाहरणे पुढे आली आहे. शहराच्या चौफेर हा व्यवसाय सुरू असून त्यात अनेक प्रतिष्ठीतांचा सहभागही आढळून आला आहे. इसार झालेल्या संपत्तीची यादी बघितल्यास प्रशासनाचेही डोळे विस्फारतील, अशी स्थिती आहे.पोलिसांनी मुळापर्यंत जाण्याची आयती संधी सोडलीयवतमाळ शहरात उघडपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात कोट्यवधींची अवैध सावकारी, बिसी राजरोसपणे सुरू असताना प्रशासनाकडून त्याला कोणताच लगाम घातला गेलेला नाही. विशेषत: प्राप्तीकर विभागाचे अवैध सावकारीतील फायनान्सर आणि बिसीच्या साखळीतील प्रतिष्ठीत घटकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. ‘कुणाची फिर्याद नाही’ असे ठेवणीतील उत्तर देऊन सहकार, महसूल, पोलीस व प्राप्तीकर प्रशासन आपली सुटका करून घेत आहे. वास्तविक खून व आत्महत्यांच्या प्रकरणात सावकारीचा मुद्दा रेकॉर्डवर आल्याने पोलिसांना या अवैध सावकारीच्या मुळापर्यंत जाण्याची आयतीच संधी चालून आली होती. मात्र पोलिसांनी ती इच्छाशक्ती दाखविली नाही. त्यामागे राजकीय दबाव होता की आर्थिक उलाढाल हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.
बीसी व्यवसायातून कोट्यवधींची सावकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 21:42 IST
यवतमाळ शहर व परिसरात प्रतिष्ठित अवैध सावकारांचा धुमाकूळ सुरू असतानाचा आता बिसी (ब्रदर्ली कॉन्ट्रीब्युशन) व्यवसायातील उलाढालही पुढे आली आहे. बिसीच्या आडोशाने दरमाह कोट्यवधी रुपयांची सावकारी सुरू आहे.
बीसी व्यवसायातून कोट्यवधींची सावकारी
ठळक मुद्दे आॅर्गनायझर करतोय फायनान्स : प्राप्तीकर विभाग आहे कुठे ?, व्याजचक्रात अडकला कित्येकांचा जीव