कारागृहातील भ्रष्टाचारमुक्तीसाठी दिल्लीपर्यंत सायकल रॅली

By Admin | Updated: October 5, 2015 02:30 IST2015-10-05T02:30:13+5:302015-10-05T02:30:13+5:30

संपूर्ण देश भ्रष्टाचाराने पोखरला आहे. अशा स्थितीत तेलंगणातील कारागृहाने वर्षभरापासून भ्रष्टाचारमुक्ती केली आहे.

Bicycle rallies to Delhi for corruption in jail | कारागृहातील भ्रष्टाचारमुक्तीसाठी दिल्लीपर्यंत सायकल रॅली

कारागृहातील भ्रष्टाचारमुक्तीसाठी दिल्लीपर्यंत सायकल रॅली

तेलंगणाचे कारागृह अधिकारी : यवतमाळ कारागृहाला भेट, अधिकारी व कैद्यांशी संवाद
यवतमाळ : संपूर्ण देश भ्रष्टाचाराने पोखरला आहे. अशा स्थितीत तेलंगणातील कारागृहाने वर्षभरापासून भ्रष्टाचारमुक्ती केली आहे. ही भ्रष्टाचारमुक्ती तेलंगणापुरती मर्यादित न ठेवता देशभरात ही मोहीम राबविण्यासाठी तेलंगणातील १२ कारागृह अधिकाऱ्यांनी सायकल रॅली काढली आहे. सायकलने ते संपूर्ण देश पालथा घालणार आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी रविवारी यवतमाळात भेट दिली. शेवटची भेट ते तिहार कारागृहाला देणार आहेत.
कारागृहात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे आरोप होतात. मात्र तेलंगना राज्यातील कारागृह भ्रष्टाचारमुक्त झाले आहे. या ठिकाणी कुठलाही गैरप्रकार होत नाही. यासाठी तेलंगना प्रांताने स्वतंत्र टोल फ्री नंबर तक्रारीसाठी जाहीर केला आहे. २४ तासात संबंधितांच्या अडचणी सोडविल्या जातात. तेलंगणाप्रमाणे संपूर्ण देशालाच भ्रष्टाचारमुुक्तीची गरज आहे. याच्या जाणीवजागृतीसाठी व्यापक मोहिमेची आवश्यकता आहे.
यामुळे तेलंगणातील १२ कारागृह अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार आणि गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी तेलंगणा ते दिल्ली हा १८०० किलोमीटरचा प्रवास सायकलने केला जात आहे. दररोज १०० किमीप्रमाणे १८ दिवस अधिकारी मोहीम राबविणार आहे. यादरम्यान कारागृह आणि गावांना भेटी दिल्या जाणार आहे.
भ्रष्टाचार मुळातून नष्ट व्हावा म्हणून ही मंडळी गाव पातळीवर जाणीवजागृती करीत आहे. कारागृहाची पाहणी करीत आहे. रविवारी या चमूने यवतमाळ कारागृहाला भेट दिली. कारागृहातील प्रशासन व्यवस्था आणि कैदी बांधवाची पाहणी केली. या ठिकाणच्या स्वच्छता आणि शिस्तीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. टोल फ्री नंबरचे स्टिकर प्रवेशद्वारावर लावले. या मोहिमेदरम्यान दोन लाख पोस्टर गावोगावी लावले जाणार आहेत. यासोबतच जाणीवजागृती ही मंडळी करीत आहे. मोहिमेतील अधिकारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
या मोहिमेत श्रीनिवास रेड्डी, आर. राजेंद्र, बी. नागाराजू, व्ही. जोसेफ, व्यंकटरम रेड्डी, सुदर्शन रेड्डी, पी. उपेंद्र, जानकी रामुली, पी. हरीश, टी. भास्कराचार्य, एम. ए. बारी यांचा सहभाग आहे. कारागृह अधीक्षक श्रीकृष्ण भुसारे आणि त्यांच्या चमूने तेलंगणाच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. (शहर वार्ताहर)

Web Title: Bicycle rallies to Delhi for corruption in jail