तीन मैत्रिणींसोबत यात्रेत गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रयत्न ; आरोपीला दोन तासात गाठण्यात आले यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 20:21 IST2025-10-24T16:08:06+5:302025-10-24T20:21:16+5:30
आरोपी अटकेत : पांढरदेवी गायगोधनयात्रेतील घटना

Attempted rape on minor girl who was on a pilgrimage with three friends; Accused caught within two hours
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव (यवतमाळ) : पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या पांढरदेवी येथील गायगोधन उत्सव पाहण्यासाठी मैत्रिणीसोबत गेलेल्या एका १४ वर्षीय मुलीला बळजबरीने जंगलात ओढत नेत तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आला. ही संतापजनक घटना बुधवार २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता पांडवदेवी परिसरात घडली. या प्रकरणी आरोपी नराधम कैलास सूर्यभान आत्राम (२८, रा. आवळगाव) या तरुणाला पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली.
पांढरदेवी येथे गायगोधन उत्सवानिमित्त यात्रा भरते. बुधवारी या यात्रेत नागरिकांची मोठी गर्दी होती. बुधवारी या यात्रेत हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांचाही तगडा बंदोबस्त होता. पांढरदेवी मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या एका गावातील १४ वर्षीय बालिका हा उत्सव पाहण्यासाठी गावातील आपल्या तीन मैत्रिणींसह आली होती. उत्सव पाहत असताना गर्दी खूप असल्याने या चार मैत्रिणींमध्ये ताटातूट झाली. पीडित बालिका मैत्रिणीचा शोध घेत असताना यावेळी आरोपी कैलास आत्राम हा पाणवठ्याजवळ उभा होता. त्याने पीडितेला गर्दीपासून दूर नेले. नंतर धमकी देत बळजबरीने तोंड दाबून ओढत जंगलात नेले. तेथे तिच्यावर पाशवी अत्याचार केला.
पीडित बालिकेने पळ काढला. नराधमाने काही अंतर तिचा पाठलाग केला. मात्र, पीडित बालिका हाती लागत नाही हे लक्षात येताच, नराधमाने जंगलात धूम ठोकली. पीडितेने काकाला आपबीती सांगितली. याची माहिती पीडित मुलीच्या आईवडिलांना देण्यात आली. आईवडिलांनी मारेगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
दारूचे अड्डे बनले अत्याचाराचे केंद्र
मारेगाव तालुक्यात अवैध दारूविक्री होत नसल्याचा दावा पोलिस विभाग करीत असला तरी अवैध दारूचे अड्डे तालुक्यात सर्रास सुरू असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. आरोपी दररोज दारू पिण्यासाठी पीडितेच्या गावात जात होता. तालुक्यातील तरुणाई व्यसनाधीन बनली आहे. यातून खून, अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. पोलिस विभाग मात्र याकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे.
वर्णनावरून घेतला आरोपीचा शोध
आरोपीला दारू पिण्याचे व्यसन आहे. तो दारू पिण्यासाठी पीडित बालिकेच्या गावात जात होता. यातून पीडितेसोबत आरोपीची तोंडओळख होती. मात्र, पीडितेला आरोपीचे नाव माहीत नसल्याने आरोपी शोधणे पोलिसांना कठीण झाले होते.
पीडितेने केलेल्या वर्णनावरून अवघ्या दोन तासांत पोलिसांनी आरोपीला पकडून अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.